महाराष्ट्राची विदर्भावर 33 धावांनी मात

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-18 03:20:00

img

वृत्तसंस्था /वडोदरा :

येथे सुरु असलेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत महाराष्ट्राने विदर्भावर 33 धावांनी विजय संपादन केला. प्रारंभी, अंकित बावणे (नाबाद 92) व ऋतुराज गायकवाड (59) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर 7 बाद 260 धावा जमवल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना मात्र विदर्भाचा डाव 227 धावांवर संपुष्टात आला. या विजयासह महाराष्ट्राला चार गुण मिळाले आहेत.

प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. कर्णधार केदार जाधव (9), नौशाद शेख (11), निखिल नाईक (9) हे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने महाराष्ट्राची 3 बाद 69 अशी स्थिती झाली होती. ऋतुराज गायकवाडने 34 चेंडूत 59 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो ही बाद झाल्यानंतर महाराष्ट्र संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. अंकित बावणेने मात्र 117 चेंडूत 11 चौकार व 1 षटकारासह नाबाद 92 धावांची संयमी खेळी साकारत संघाला अडीचशेपर्यंत मजल मारुन दिली. त्याला स्वप्नील बच्छाव (30), राहुल त्रिपाठी (23) यांनी चांगली साथ दिली.

विजयी आव्हानाचा पाठलाग करताना ठराविक अंतराने विदर्भाचे फलंदाज बाद होत गेल्याने त्यांचा डाव 46.4 षटकांत 227 धावांवर आटोपला. अझीम काझीने 46 धावांत 5 बळी घेत विदर्भाच्या फलंदाजीला चांगलेच खिंडार पाडले.  विदर्भाकडून अक्षय वाडकर (90 चेंडूत 75) व आदित्य सरवटे (48) यांनी सर्वाधिक धावा केल्या. इतर फलंदाजांची मात्र त्यांना समायोचित साथ मिळाली नाही. महाराष्ट्राकडून स्वप्नील बच्छावने 2, फल्लाह, निकीत धुमाळ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र 50 षटकांत 7 बाद 260 (ऋतुराज गायकवाड 59, अंकित बावणे नाबाद 92, राहुल त्रिपाठी 23, स्वप्नील बच्छाव नाबाद 30, अक्षय कर्णेवार 3/40, अक्षय वाखरे 2/36)

विदर्भ 46.4 षटकांत सर्वबाद 227 (अक्षय वाडकर 75, आदित्य सरवटे 48, अझीम काझी 5/46, बच्छाव 2/56).

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN