महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात

Loksatta

Loksatta

Author 2019-10-19 02:23:38

img

डेहराडून : सलामीवीर ऋतुराज गायकवाड (५९) आणि अंकित बावणे (नाबाद ९२) यांनी साकारलेल्या दिमाखदार अर्धशतकांना अझिम काझीच्या पाच बळींची योग्य साथ लाभल्यामुळे महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत एलिट ‘ब’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात विदर्भाचा ३३ धावांनी पराभव केला. परंतु विजयानंतरही त्यांना उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले.

महाराष्ट्राचा हा या हंगामातील तिसरा विजय ठरला, तर विदर्भाला अखेरच्या साखळी सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. गुणतालिकेत महाराष्ट्राला १०व्या, तर विदर्भाला १४व्या स्थानी समाधान मानावे लागले.

बडोदा येथील गुजरात स्टेट फर्टिलायझर मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने कर्णधार आणि सलामीवीर केदार जाधवला (९) लवकर गमावले. भरवशाचा नौशाद शेखही (९) फारशी चमक दाखवू शकला नाही. परंतु ऋतुराज आणि अंकित यांनी संयमी फलंदाजी करून महाराष्ट्राचा डाव सावरला. ऋतुराजने आठ चौकार आणि तीन षटकारांसह ५९, तर अंकितने ११ चौकार आणि एक षटकारासह ९२ धावा फटकावल्यामुळे महाराष्ट्राने ५० षटकांत ७ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली. सत्यजीत बच्छावनेसुद्धा (नाबाद ३०) बहुमूल्य योगदान दिले.

प्रत्युत्तरादाखल अझिमच्या (५/४६) डावखुऱ्या फिरकीपुढे विदर्भाचा डाव ४६.४ षटकांत २२७ धावांवर संपुष्टात आला. अक्षय वाडकर (७५) आणि आदित्य सरवटे (४८) यांच्या झुंजार खेळीनंतरही विदर्भाला विजयी लक्ष्य गाठण्यात अपयश आले.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : ५० षटकांत ७ बाद २६० (अंकित बावणे नाबाद ९२, ऋतुराज गायकवाड ५९; अक्षय कर्णेवार ३/४०) विजयी वि. विदर्भ : ४६.४ षटकांत सर्व बाद २२७ (अक्षय वाडकर ७५, आदित्य सरवटे ४८; अझिम काझी ५/४६).

उपांत्यपूर्व फेरी

* रविवार, २० ऑक्टोबर

कर्नाटक वि. पुदुचेरी

दिल्ली वि. गुजरात

* सोमवार, २१ ऑक्टोबर

पंजाब वि. तमिळनाडू

मुंबई वि. छत्तीसगड

* सर्व सामन्यांची वेळ : सकाळी ९ वाजल्यापासून

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD