महाविद्यालयीन क्रिकेटचे पुनरुज्जीवन आवश्यक!

Loksatta

Loksatta

Author 2019-10-09 06:09:18

img

मुंबई क्रिकेट संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय पाटील यांची भूमिका:– शालेय आणि महाविद्यालयीन क्रिकेटची मोठी परंपरा मुंबईला आहे. शालेय क्रिकेट आपले वैभव टिकवून आहे. परंतु महाविद्यालयीन क्रिकेटचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका मुंबई क्रिकेट संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी मांडली.

बऱ्याच वर्षांपूर्वी मुंबईतील महाविद्यालयीन क्रिकेटला फार मोठी प्रतिष्ठा होती. दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील यांच्यासारखे क्रिकेटपटू या महाविद्यालयीन क्रिकेटनेच दिले आहेत, असे पाटील यांनी सांगितले. ४१ वेळा रणजी करंडक विजेतेपदाची प्रतिष्ठा जपणाऱ्या मुंबई क्रिकेटने अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देशाला दिले आहेत. ही परंपरा कायम राहण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. अध्यक्षपदाच्या जबाबदारीनंतर आगामी आव्हाने आणि दृष्टिकोन याबाबत पाटील यांच्याशी केलेली खास बातचीत –

गेली अनेक वर्षे ‘एमसीए’ची निवडणूक लढल्यानंतर यंदा अध्यक्षपद मिळाले. या यशाचे कसे विश्लेषण कराल?

सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा देऊन मला या पदावर आणल्याबद्दल मी अतिशय आनंदित आहे. मुंबई क्रिकेटचा इतिहास पाहिल्यास फार मोठी जबाबदारी माझ्यासह कार्यकारिणी समितीकडे दिली गेली आहे. लहानपणापासून माझे क्रिकेटशी जवळचे नाते आहे. मग डी. वाय. पाटील स्टेडियमच्या निर्मितीसाठी मी मेहनत घेतली. माझ्याकडे असलेला अनुभव क्रिकेटच्या मोठय़ा व्यासपीठावर वापरू शकेन, यावर माझा विश्वास होता. तोच सार्थ ठरवला आहे.

मुंबईच्या क्रिकेटला काय साध्य करायचे आहे?

मुंबईप्रमाणेच देशातील अन्य राज्यांमध्ये छोटय़ा जिल्ह्यांत किंवा क्रिकेटच्या पायाभूत सुविधा आता उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे स्पर्धात्मकता अधिक वाढली आहे. एके काळी मुंबईचे सहा-सात खेळाडू भारतीय संघात असायचे, याची आता पुनरावृत्ती करणे आव्हानात्मक ठरेल. परंतु दर्जा टिकवण्याची प्रक्रिया कायम ठेवावी लागेल. गेल्या १० वर्षांत मुंबई क्रिकेटमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत. शरद पवार यांच्या कारकीर्दीत वांद्रे-कुर्ला आणि कांदिवली येथे उत्तम क्रिकेट मैदाने तयार करण्यात आली आहेत. आता मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या मदतीने शहरातील क्रिकेट पद्धती विकसित करण्याची योजना आहे. जगातील अनेक क्रिकेट अकादम्या मी पाहिल्या आहेत. क्रीडा विज्ञान आता प्रशिक्षक आणि फिजिओ यांच्या फार पुढे गेले आहे. खेळाचे तंत्रही काळानुसार बदलले आहे.

लोढा समितीच्या शिफारसी लागू झाल्यानंतर मुंबईची पहिलीच निवडणूक होत आहे. जुन्या संघटकांचे वर्चस्व आणि राजकीय पक्ष निवडणुकीच्या राजकारणातून वजा झाले आहेत का?

लोढा समितीच्या शिफारशींआधारे मुंबई क्रिकेटनेही आदर्श संघटना होण्यासाठी त्याचा स्वीकार केला आहे. या शिफारशींमुळे क्रिकेटपटूंना योग्य न्याय देण्यात आला आहे. अन्य शिफारशींबाबत अनेकांची वेगवेगळी मते असू शकतात. परंतु पुढील पाच-दहा वर्षांत त्यांचा योग्य परिणाम आपल्याला दिसून येईल.

तुमच्यासमोर महत्त्वाची आव्हाने कोणती असतील?

विभागीय स्तरावर अकादम्या, गुणवत्ता शोधमोहिमेसाठी योग्य समित्या, शासनाच्या मदतीने मैदानांची उपलब्धता ही कार्यकारिणी समितीपुढील प्रमुख आव्हाने असतील. क्रिकेट आता पालघर-डहाणू, बदलापूर-कर्जत, नवी मुंबई इथपर्यंत पसरले आहे. शाळा आणि महाविद्यालयांना अधिकाधिक मैदाने मिळण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.

कार्यालयीन क्रिकेटबाबत काय सांगाल?

  • क्रिकेटपटूंचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवणारा तो मुंबई क्रिकेटमधील हा महत्त्वाचा घटक आहे. कार्यालयीन क्रिकेटसाठी स्पर्धा वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील.

वयचोरी आणि सामनानिश्चिती या समस्यांकडे तुम्ही कसे पाहता?

  • वयचोरी आणि सामनानिश्चिती संदर्भात यंत्रणा अधिक सक्षम राहील, याची काळजी घेऊ. याचप्रमाणे खेळाडूंमध्ये जागृती निर्माण करण्याचे आमचे धोरण असेल.
READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN