मालिकापराभवाचे ‘वादळ’ शमवण्याचे आव्हान

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-07 05:44:00

img

करा वा मरा धर्तीवर बांगलादेशविरुद्धची लढत

राजकोट / वृत्तसंस्था

गुजरातच्या किनारपट्टीवर ‘माहा’ नावाचे वादळ घोंघावत असताना दुसरीकडे, याच राज्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर बांगलादेशविरुद्ध मालिका पराभवाच्या नामुष्कीचे वादळ शमवण्याचे तुंबळ आव्हान असेल. बांगलादेशने यापूर्वी दिल्लीतील पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सफाया केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता राजकोटमध्ये मालिका विजयाच्या निर्धाराने बांगलादेश डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करणार असून यामुळे घरच्या मैदानावर खेळताना खरे दडपण यजमान भारतीय संघासमोरच असणार आहे. सायंकाळी 7 वाजता या लढतीला प्रारंभ होईल.

वास्तविक, बांगलादेशचा संघ मागील दोन-एक आठवडय़ात विविध संकटे, अडचणी, आव्हानातून मार्ग काढत भारत दौऱयावर पोहोचला. प्रारंभी बांगलादेश क्रिकेट मंडळाशी त्यांच्या खेळाडूंचा वाद सुरु होता व यावरुन त्यांच्या खेळाडूंनी बंडाचे निशाणही उपसले होते. त्यावर वेळीच निर्णय होतो न होतो, तोच शकीब हसन या त्यांच्या अनुभवी खेळाडूवर बुकीच्या संपर्काची माहिती न दिल्याबद्दल दोन वर्षांची बंदी लादली गेल्याने बांगलादेशी क्रिकेट पुन्हा संकटाच्या खाईत लोटले गेले. पण, तरीही या प्रतिकूल बाबींचा मैदानावरील कामगिरीवर विपरीत परिणाम होणार नाही, याची दक्षता घेत बांगलादेशने दिल्लीतील पहिल्या टी-20 सामन्यात धमाकेदार विजय संपादन केला होता.

भारतीय संघाला वनडे व कसोटी क्रिकेटप्रमाणे टी-20 क्रिकेटमध्ये अलीकडे सातत्यपूर्ण प्रदर्शन साकारता आलेले नाही आणि या वर्षाच्या निकालावरुनही त्याची प्रचिती आली आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीसह अन्य काही दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीत या मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंना मात्र नामी संधी असणार आहे. अर्थात, माहा या वादळाची झळ किती बसणार, यावर या लढतीचे भवितव्य अवलंबून असेल, हे स्वाभाविक आहे.

यापूर्वी दिल्लीत पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर हंगामी कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षणात आपला संघ कमी पडल्याचे व काही डीआरएस चुकीचे घेतले, त्याचा फटका बसल्याचे कबूल केले. आता आज होणाऱया दुसऱया टी-20 सामन्यात शिखर धवनचा खराब फॉर्म व स्ट्राईक रेट याची भारताला नव्याने चिंता असेल.

रोहितनेच पुढाकार घेण्याची गरज

सध्याच्या टी-20 संघात रोहित शर्मा हाच सर्वाधिक अनुभवी आघाडीवर आहे आणि अर्थातच, आजच्या लढतीत त्यानेच पुढाकार घेण्याची गरज असेल. यापूर्वी अरुण जेटली स्टेडियमवरील पहिल्या लढतीत रोहित अपयशी ठरला होता. ती कसर त्याला येथे भरुन काढावी लागेल. धवनने त्या लढतीत 42 चेंडूत 41 धावा केल्या. मात्र, या संथ फलंदाजीमुळे त्याचा स्ट्राईकरेट व फॉर्म यावर नव्याने प्रश्न उपस्थित झाले.

उर्वरित दोन लढतीत धवनला फॉर्म सापडला नाही तर अधिक प्रश्न उभे ठाकतील, असे ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांनी यापूर्वीच म्हटले आहे. धवनप्रमाणेच केएल राहुलवरही येथे दडपण असेल. कसोटी संघातील स्थान गमावल्यानंतर राहुलवर आता टी-20 संघातील जागा वाचवण्यावर भर द्यावा लागणार आहे. वास्तविक, रविवारी पहिल्या लढतीत भारताच्या युवा सेनेकडून बरीच अपेक्षा होती. पण, श्रेयस अय्यरचा अपवाद वगळता अन्य सर्व खेळाडूंनी निराशाच केली. ऋषभ पंत, कृणाल पंडय़ा व अष्टपैलू शिवम दुबे यांना आपली उपयुक्तता सिद्ध करता आलेली नाही. त्यांना येथे वेळेची गरज ओळखून त्यानुसार खेळ साकारावा लागणार आहे.

शिवम दुबे की संजू सॅमसन?

भारतीय संघव्यवस्थापन शिवम दुबेला आणखी एक संधी देणार की, केरळचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनची वर्णी लावणार, हे देखील आज येथे निश्चित होईल. याशिवाय, कर्नाटकाचा फलंदाज मनीष पांडे संघात आला तर दुबे व सॅमसन यांच्यापैकी एकाला संघात जागा मिळणार नाही, असे संकेत आहेत.

अननुभवी गोलंदाजी ही चिंता

भारतीय संघासाठी अननुभवी गोलंदाज ही या मालिकेतील मुख्य चिंता ठरत आली आहे. आघाडीचा मध्यमगती गोलंदाज खलील अहमदने आपल्या 4 षटकात तब्बल 37 धावा दिल्या. त्याला 19 व्या षटकात सलग चार चौकारांसाठी फटकावले गेले. त्यामुळे, येथे त्याला वगळत शार्दुल ठाकुरला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल व कृणाल पंडय़ा यांना प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखावे तर लागेलच. पण, त्याचबरोबर योग्य वेळी बळीही घ्यावे लागतील. पहिल्या टी-20 लढतीत 149 धावांचा यशस्वी पाठलाग करताना बांगलादेशतर्फे रहीमच्या 60 धावांची खेळी निर्णायक ठरली होती. येथे तो आणखी एक जबाबदार खेळी साकारु शकतो. फिरकीपटू अमिनूल इस्लाम व शफिउल इस्लाम यांनी दिल्लीत उत्तम मारा केला आणि येथे राजकोटमध्येही त्यांच्याकडून हीच अपेक्षा असणार आहे.

संभाव्य संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), खलील अहमद, यजुवेंद्र चहल, दीपक चहर, राहुल चहर, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कृणाल पंडय़ा, ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर.

बांगलादेश : महमुदुल्लाह रियाद (कर्णधार), तैजूल इस्लाम, मोहम्मद मिथुन, लिटॉन कुमार दास, सौम्या सरकार, नईम शेख, मुश्फिकूर रहीम, अफिफ होसेन, मोसद्देक होसेन सैकत, अमिनूल इस्लाम बिपलॉब, अराफत सनी, अबू हिदर, अल-अमिन होसेन, मुस्तफिजूर रहमान, शफिउल इस्लाम.

सामन्याची वेळ : सायं. 7 पासून.

…तर भारतासमोर उभे राहणार अनेक प्रश्न!

भारताला या मालिकेत एखाद्या प्रसंगी पराभव स्वीकारावा लागला तर त्या नामुष्कीमुळे अनेक प्रश्न उभे राहतील, अशी दाट शक्यता आहे. विशेषतः पुढील वर्षातच टी-20 विश्वचषक स्पर्धा होत असताना टी-20 क्रिकेटमधील घसरण भारतीय संघव्यवस्थापनासाठी चिंतेची ठरु शकते. भारताने वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये धवल यश संपादन केले. पण, टी-20 मध्ये ते असे साम्राज्य प्रस्थापित करण्यात सातत्याने अपयशी ठरत आले आहेत, असे सांख्यिकीवरुन दिसून येते.

कोटस

फलंदाजी लाईनअप उत्तम आहे. त्यात बदल करावेसे वाटत नाहीत. राजकोटची खेळपट्टी फलंदाजीला पोषक असते आणि गोलंदाजांनाही पहिल्या टप्प्यात मदत करते. गोलंदाजीच्या आघाडीवर मात्र चिंता आहेत.

-भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्मा

ही मालिका जिंकू शकलो तर आमच्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा असेल. पहिला सामना जिंकल्यानंतर आमचे सर्व लक्ष आजच्या दुसऱया सामन्यावरच राहिले आहे, हे मी आवर्जून सांगू इच्छितो.

-बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाह

रोहित बनणार 100 सामने खेळणारा पहिला भारतीय

हंगामी कर्णधार रोहित शर्मा हा आजच्या लढतीत मैदानावर उतरल्यानंतर 100 टी-20 सामने खेळणारा पहिला भारतीय व जागतिक स्तरावरील दुसरा खेळाडू ठरणार आहे. पाकिस्तानचा शोएब मलिक (111 सामने) हा 100 पेक्षा अधिक टी-20 सामने खेळणारा आतापर्यंतचा एकमेव फलंदाज आहे. टी-20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा रोहितच्या खात्यावरच असून त्याने 2452 धावा जमवल्या आहेत. यात 136.67 च्या स्ट्राईकरेटने 4 शतके व 17 अर्धशतकांचा समावेश आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD