मालिका विजयाची दोन्ही संघांना संधी

Indian News

Indian News

Author 2019-11-10 09:30:35

img

भारत-बांगलादेशदरम्यान आज निर्णायक लढत
नागपूर: पहिल्या सामन्यातील पराभव विसरून कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने राजकोट यशील दुसऱ्या सामन्यात धडाक्‍यात पुनरागमन करत टी-20 क्रिकेटच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. आता आज होत असलेल्या तिसऱ्या व निर्णायक सामन्यातील विजयाद्वारे दोन्ही संघांना मालिका विजयाची संधी आहे.
राजधानीत झालेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती, त्यावेळी भारतीय संघाच्या सुमार कामगिरीवर प्रचंड टीका झाली. राजकोट येथील सामन्यात मात्र कर्णघार रोहितच्या तडाखेबंद फलंदाजीने संघाने मालिकेत बरोबरी केली.

आता अपयश झटकून सरस कामगिरीसाठी सज्ज असलेल्या भारतीय संघालाच आजच्या सामन्यात संभाव्य विजेता समजले जात आहे. अर्थात, नवीन कर्णधार महंमदुल्लाच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचा संघ देखील चमत्कार घडवू शकतो. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे संकेत रोहितने दिले असले तरी सकाळी खेळपट्टी पाहूनच अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

रोहित विक्रमाच्या उंबरठ्यावर

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा एका अनोख्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. आजच्या सामन्यात त्याने जर दोन षटकार फटकावले तर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार पूर्ण होतील व अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल.तसेच जागतिक क्रिकेटमधे सर्वाधिक षटकार फटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित तिसरा खेळाडू बनेल. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल याच्या नावावर 523 तर, पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदीच्या नावावर 476 षटकारांची नोंद आहे.

अवकाळी पाऊस देशातून गेल्याची चिन्हे दिसत असून हिवाळ्याची देखील चाहूल लागलेली असल्याने येथील खेळपट्टीवर दव पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. मात्र, येथील खेळपट्टीचा इतिहास पाहता फिरकी गोलंदाज जास्त यशस्वी ठरले आहेत. यजुर्वेंद्र चहलने दुसऱ्या सामन्यात वर्चस्व राखले होते, त्यामुळे याही सामन्यात फिरकी गोलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरेल. नियमित कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, हार्दिक पंड्या, महंमद शमी या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत रोहितच्या नेतृत्वाखाली अव्वल कामगिरी करण्याची जबाबदारी नवोदितांवर आहे.

खलील अहमदच्या जागी शार्दुल ठाकूर याला संधी देण्यात येणार का तसेच शिखर धवनच्या जागी मनिष पांडेचा समावेश करण्यात येईल का, असा प्रश्‍न आहे. कारण संजू सॅमसनसह या खेळाडूंची संघात निवड तर झाली मात्र त्यांना सामना खेळायला मिळालेला नाही. तसेच ही मालिका संपल्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार असून त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका होणार आहे. अशा स्थितीत या नव्या खेळाडूंना तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

बांगलादेशचा संघ आता लिंबूटिंबू राहिलेला नाही. त्यांनी भारताविरुद्धच्या 8 टी-20 सामन्यांतील सलग पराभवांची मालिका नवी दिल्लीतील सामन्याने मोडली. आता त्यांना देखील भारतात प्रथमच मालिका जिंकण्याची संधी आहे. राजकोट येथील सामन्यांत त्यांच्या फलंदाजांनी अत्यंत हाराकिरी पत्करली होती, त्यातून बाहेर येत त्यांना सरस खेळ करावा लागणार आहे. तमिम ईक्‍बाल आणि शकिब अल हसन यांच्या अनुपस्थित त्यांच्या नवोदीत खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे, मात्र राजकोट येथील सामन्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यांना आजच्या सामन्यात जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN