मास्कसह बांगला खेळाडूचा सराव
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असतानाच बांगलादेश संघातील खेळाडूनी मास्क घालून सराव केला. मात्र, भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्मा याने प्रदूषणाचा सामन्यावर कोणताही परिणाम होणार नाही ही अपेक्षा व्यक्त केली. बांगलादेशचा आघाडीचा फलंदाज लिटॉन दास याने मास्क परिधान करून सराव केल्याचे छायाचित्र तसेच व्हिडीओ प्रसारीत झाले; पण त्याने हा मास्क काहीवेळच घातला असल्याचेही सांगितले जात आहे. दिल्लीतील प्रदूषण गंभीर असल्याचे माजी क्रिकेटपटू तसेच खासदार गौतम गंभीर यांनी सांगितले. पण, रोहित शर्मा यास फारसे महत्त्व द्यायला तयार नाही. मी नुकताच दिल्लीत आलो आहे. नेमके प्रदूषण किती आहे, हे सांगता येणार नाही. पण 3 नोव्हेंबरला भारत आणि बांगलादेश ट्वेंटी-20 लढत दिल्लीत आहे. त्यात आम्ही खेळणार आहोत, असे रोहितने सांगितले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. आम्ही यापूर्वी दिल्लीत श्रीलंकेविरुद्ध कसोटी खेळलो आहोत. त्यावेळी आम्हाला कसलाही त्रास झाला नव्हता. प्रदूषणाबाबत काय चर्चा सुरू आहे हे माहिती नाही, पण मला तरी काही प्रश्न नाही, असे रोहितने सांगितले. रोहितने आठवण करून दिलेल्या दिल्ली कसोटीत श्रीलंकेचे खेळाडू मास्क घालून खेळले होते. त्याचा त्रासही खेळाडूंना झाला होता. एवढेच नव्हे तर धुरक्यामुळे खेळ वीस मिनिटे थांबला होता. बांगलादेश संघाने सराव केला, त्यावेळीही कमालीचे धुरके होते. सरावाच्या सुरुवातीस लिटनने मास्क परिधान केला होता, पण दहा मिनिटानंतर तो काढून टाकला. फलंदाजीचा सराव करताना त्याने मास्क घातला नव्हता. बांगलादेशच्या अन्य कोणत्याही खेळाडूने मास्क घातला नव्हता. "वैयक्तिक कारणास्तव मी मास्क घातला होता. प्रदूषणाचा त्रास झाल्यामुळे नव्हे,' असे लिटॉनने स्पष्ट केले. दिल्लीतील प्रदूषण ही गंभीर बाब आहे; मात्र लढतीच्या आयोजनासाठी आम्ही दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतली आहे. त्या दिवशी प्रदूषणाचा त्रास नसेल असे आम्हाला सांगितले आहे, त्यानंतरच लढत निश्चित केली. आम्ही प्रदूषण कमी करण्याबाबत विविध संस्थांबरोबर चर्चा करीत आहोत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत लढत अन्यत्र हलवणे अशक्य आहे.
- अरुण धुमाळ, भारतीय क्रिकेट मंडळाचे खजिनदार