रसिकप्रिय क्रिकेट संवादकाशी भेट

Loksatta

Loksatta

Author 2019-10-06 03:41:21

img

क्रिकेट समालोचनाला वेगळी उंची प्रदान करणारे रसिकप्रिय समालोचक आणि संवादक हर्ष भोगले हे यंदा ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहेत. सचिन तेंडुलकरचा उदय, भारतीय क्रिकेटला पुन्हा मिळालेले वैभव, टी-२० क्रिकेटचा भलाबुरा प्रभाव अशा क्रिकेटमधील विविध स्थित्यंतरांचे जवळचे साक्षीदार आणि अभ्यासक ही त्यांची ओळख. नर्मविनोदी कथनशैली, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि सुविद्य पाश्र्वभूमी या गुणांमुळे आघाडीच्या क्रिकेटपटूंइतकीच लोकप्रियता त्यांना लाभलेली आहे.

केमिकल इंजिनीअरिंगमधील पदवी आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद) येथून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही हर्ष भोगले यांनी नोकरीची सुस्थिर वाट न पकडता, वेगळा विचार केला. विद्यापीठ स्तरावर त्यांनी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती.  परंतु भाषेवरील प्रभुत्व, शब्दांवरील पकड, हजरजबाबीपणा आणि परिस्थितीचे अचूक निरीक्षण रसाळ भाषेत मांडण्याची क्षमता या शिदोरीवर त्यांनी त्या वेळी काहीशा दोलायमान अशा क्रिकेट समालोचन क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर आजतागायत ४००हून अधिक एकदिवसीय सामने, १००हून अधिक कसोटी सामने, असंख्य टी-२० सामन्यांचे देशात आणि परदेशात जाऊन त्यांनी समालोचन केले आहे. अत्यंत ओघवत्या, नर्मविनोदी परंतु नेहमी विनयशील अशा शैलीमुळे घराघरांमध्ये हर्ष भोगले यांचे चाहते आहेत. टीव्हीवर क्रिकेटचा सामना आणि हर्ष भोगले यांचे समालोचन हे जणू समीकरणच बनून गेले. नुसत्या सामन्याच्या स्थितीवर्णनापलीकडे माहितीचा अखंड आणि ओघवता साठा, त्याला अभ्यासाची जोड यांमुळे त्यांचे समालोचन जगभरात लोकप्रिय झाले आहे.  समालोचनाबरोबरच ‘इंडियन एक्स्प्रेस’सह अनेक आघाडीची वृत्तपत्रे, नियतकालिके, संकेतस्थळ यांच्यासाठी त्यांनी विपुल लिखाणही केले आहे. ते ‘मोटिव्हेशनल वक्ते’ म्हणूनही ओळखले जातात.

दैनंदिन वृत्तव्यवहाराच्या पलीकडे जाऊन विचारांच्या नवनव्या दिशांचा शोध घेण्यासाठीचा वाचकस्नेही संवादसेतू असा हा ‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रम. ख्यातकीर्त साहित्यिक एस. एल. भैरप्पा, ज्येष्ठ गायक-संगीतज्ञ-लेखक पं. सत्यशील देशपांडे, अभिजात संगीतात स्वत:चा ठसा उमटविणारे पं. मुकुल शिवपुत्र, लेखक-शायर जावेद अख्तर, अभिनेते नसिरुद्दीन शहा, मनस्वी कवी गुलजार, रंगरेषाकार सुभाष अवचट, गानविदुषी प्रभा अत्रे, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, ख्याल संगीतात गेल्या तीन दशकांत अनेक प्रयोग करणारे उस्ताद राशिद खान आदी मान्यवरांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.

‘एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता गप्पा’ हा कार्यक्रम येत्या ११ ऑक्टोबर रोजी (शुक्रवार) पुण्यात होत असून, ‘तन्वी हर्बल्स’ हे कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर आहेत.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN