राष्ट्रीय टी-20 स्पर्धेत झळकणार  नाशिकचा सत्यजित बच्छाव

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-11-07 11:04:30

img

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव यावर्षीदेखील महाराष्ट्र संघातर्फे फलंदाजांची फिरकी घेण्यास सज्ज झाला आहे. सय्यद मुश्‍ताक अली टी-20 स्पर्धेसाठी सत्यजितची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे टी-ट्‌वेंटी सामन्यांची सय्यद मुश्‍ताक अली चषक स्पर्धा होत आहे.

स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर यंदा आयपीएल या लोकप्रिय क्रिकेट स्पर्धेत सत्यजीतला खेळण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. 
गेल्या वर्षी या स्पर्धेत सत्यजित बच्छाव सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता. यावेळी महाराष्ट्र संघाने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले होते. तसेच गेल्या वर्षी आयपीएलच्या खेळाडूंच्या लिलावात "ऑक्‍शन'मध्ये सत्यजित बच्छाव याच्यावर बोली लागली गेली नव्हती.

मुश्‍ताक अली ट्रॉफी आयपीएल ऑक्‍शननंतर झाल्यामुळे सत्यजितला स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा खेळाडू असून सुद्धा आयपीएल स्पर्धेत येण्याची संधी गमवावी लागली. परंतु यावर्षी आयपीएल ऑक्‍शन डिसेंबर महिन्यात होणार असून त्यापूर्वीच मुश्‍ताक अली चषक होणार असल्याने यावर्षी सत्यजित बच्छावच्या कामगिरीकडे आयपीएल संघांचे लक्ष असेल. यंदादेखील या स्पर्धेत मागील वर्षाप्रमाणेच उत्कृष्ट कामगिरी करून सत्यजित आयपीएल स्पर्धेत दिसेल, अशी अपेक्षा नाशिककरांना लागून आहे. 

यंदा चंदीगड येथे शुक्रवार (ता.8) पासून ही स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना शुक्रवारी (ता.8) रेल्वेविरुद्ध होणार आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश विरूद्ध 11नोव्हेंबरला, तर 12 नोव्हेंबरला छत्तीसगड आणि 15 नोव्हेंबरला हिमाचलप्रदेश संघाविरूद्ध महाराष्ट्राचे सामने होणार आहेत. 
सत्यजितच्या महाराष्ट्र संघातील या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व क्रिकेट प्रेमींकडून आनंद व्यक्‍त केला जातो आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे, संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 
----------------

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD