राष्ट्रीय निवड समितीवर युवराजची कडाडून टीका

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-05 05:14:00

img

मुंबई / वृत्तसंस्था

माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंगने एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीवर पुन्हा एकदा कडाडून टीका केली, तसेच राष्ट्रीय निवड समितीत अव्वल दर्जाचे सदस्य असावेत, अशी अपेक्षा नोंदवली.

‘निवडकर्त्यांची जबाबदारी साधी-सोपी असत नाही. ज्यावेळी ते 15 सदस्यीय संघ निवडतात, त्यावेळी अन्य 15 जणांचे काय, याचा विचार त्यांना करावा लागतो. ही जबाबदारी आव्हानात्मक आहे. पण, सध्याच्या निवड समितीची विचारसरणी आधुनिक युगातील क्रिकेटशी मिळतीजुळती अजिबात नाही’, असे युवराज म्हणाला.

‘मी स्वतः नेहमी खेळाडूंचा सर्वप्रथम विचार करतो आणि त्यांच्याविषयी सकारात्मक असतो. जेव्हा निकाल विरोधात जातात, त्यावेळी खेळाडूंची पाठराखण करणे गरजेचे असते. ज्यावेळी खराब प्रदर्शन होते, त्यावेळी प्रत्येक जण विरोधात बोलतो. माझ्या मते सध्याच्या निवड समिती सदस्यांपेक्षा सरस सदस्य असावेत’, असे या माजी अष्टपैलू खेळाडूने नमूद केले.

युवराजने निवड समितीवर यापूर्वी देखील अनेकदा टीकेचे आसूड ओढले आहेत. यो यो चाचणी पार केल्यानंतरही संघात स्थान दिले गेले नाही, त्यावेळी त्याने निवड समितीवर जोरदार टीकास्त्र चढवले होते. विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी जूनमध्ये निवृत्ती जाहीर करणारा युवराज आगामी अबुधाबी टी-10 लीगमध्ये खेळणार असून सोनी सिक्स, सोनी टेन 3 या वाहिन्यांवर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

दुबेशी तुलना नको

मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबेची युवराजशी तुलना केली जाते. याबाबत विचारले असता युवराजने शिवमला सर्वप्रथम कारकीर्द सुरु तरी करु द्या, असे उत्तर दिले. दुबेने बांगलादेशविरुद्ध दिल्लीतील पहिल्या टी-20 सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण नोंदवले. मात्र, फलंदाजीत तो अपयशी ठरला. ‘शिवमकडे बरीच गुणवत्ता आहे. त्यामुळे, त्याने स्वतःचे स्थान निर्माण करावे’, अशी अपेक्षा युवराजने याप्रसंगी व्यक्त केली.

‘विक्रम राठोड फलंदाजी प्रशिक्षक आहे आणि त्यांनी शिवमला त्याच्या चुका दाखवणे अपेक्षित आहे. पण, स्वतः राठोडनी टी-20 क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे, ते फलंदाजांना त्यांच्या चुका दाखवू शकतात का, याबद्दल माझ्या मनात साशंकता आहे. सध्याच्या घडीला राठोड यांना अधिक वेळ देण्याची गरज आहे. तातडीने निकालाची अपेक्षा येथे करता येणार नाही’, असे निरीक्षण युवराजने नोंदवले. अष्टपैलू विजय शंकरला वर्ल्डकपसाठी अनपेक्षित संधी लाभली. पण, दुखापतीतून सावरल्यानंतर त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले गेले. याबद्दलही युवराजने निवड समितीच्या धोरणावर टीका केली.

खेळाडू असे घडत नाहीत

‘संधी देणे आणि लगेच वगळत बाहेर फेकून देणे, अशा पद्धतीने खेळाडू तयार केले जात नाहीत, हे या निवड समितीने समजून घ्यायला हवे. केवळ तीन किंवा चार डावांची संधी देऊन खेळाडू घडवले जात नसतात. सध्या टीकेचे लक्ष्य ठरत असलेला ऋषभ पंत प्रत्येक चेंडू खेळताना गोंधळलेला असतो. चेंडू फटकवायचा आहे की स्ट्राईक रोटेट करायचे आहे, हे त्याचे काहीही ठरलेले नसते. अर्थात, त्याने आतापर्यंत फक्त 8 ते 10 वनडे खेळलेले आहेत. यापूर्वी त्याने सलामीला फलंदाजी केली आहे आणि आक्रमण चढवून धावा करण्यावर त्याचा भर राहिला आहे. पण, आता मध्यफळीत फलंदाजी करताना तो या शैलीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे, त्याला अधिक वेळ देण्याची गरज आहे’, असे युवराज येथे म्हणाला.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD