रूपा गुरुनाथ 'टीएनसीए'च्या पहिल्या महिला अध्यक्ष
चेन्नई : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची मुलगी रूपा गुरुनाथ यांची 'तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन'च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. गुरुवारी चेन्नई चेपाक स्टेडियमवर झालेल्या टीएनसीएच्या ८७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्याच्या विरोधात इतर कोणीही उमेदवार नसल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
अध्यक्ष झाल्यानंतर रुपा गुरुनाथ आता बीसीसीआयच्या बैठकीत टीम एनसीएचे प्रतिनिधीत्व करतील. बुधवारी सायंकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती आणि अखेरपर्यंत फक्त रुपा यांनीच अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तत्पूर्वी , रविवारी झालेल्या तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारी बैठकीत गुरुवारी निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या एजीएममध्ये निवडल्या गेलेल्या क्रिकेट असोसिएशनच्या त्या ८७व्या अध्यक्ष आहेत.
वडील १५ वर्षे अध्यक्ष होते
रुपा यांचे वडील आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मालक एन. श्रीनिवासन २००२ ते २०१७ पर्यंत तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. सन २०१७ मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. याशिवाय ते बीसीसीआय आणि आयसीसीचे प्रमुखही होते. २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात समोर आलेल्या गुरुनाथ मयप्पन यांची पत्नी आहे.