रोमांचक सामन्यात भारतीय महिलांची आफ्रिकेवर मात

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-15 05:23:00

img

तिसऱया वनडेत भारतीय संघ 6 धावांनी विजय,

वृत्तसंस्था/ वडोदरा

सोमवारी खेळवण्यात आलेल्या भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या वनडे सामन्यात बाजी मारली आहे. अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 6 धावांनी मात करत मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश संपादन केले. प्रारंभी, भारताचा डाव अवघ्या 147 धावांत आटोपला. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिका संघाचा 140 धावांत खुर्दा उडाला. सामनावीर एकता बिश्तने 32 धावांत 3 गडी बाद करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

नाणेफेक जिंकत सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार मिताली राजने घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केली. सलामीवीर प्रिया पुनिया (0), जेमिमा रॉड्रिग्ज (3), पूनम राऊत (15), मिताली राज (11)  या स्टार खेळाडू स्वस्तात बाद झाल्या. 6 बाद 71 या बिकट स्थितीतून हरमनप्रीत कौर (5 चौकारासह 38) व शिखा पांडे (6 चौकारासह 35) धावा केल्यामुळे भारताला 146 धावांचा टप्पा गाठता आला. दक्षिण आफ्रिकेकडून मॅरिझन कपने 3, शबनीम इस्माईल-अयबोंगा खाकाने प्रत्येकी 2 बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या आफ्रिका महिला संघाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. सलामीच्या तीनही फलंदाज झटपट बाद झाल्याने पाहुण्या संघाची 3 बाद 50 अशी कठीण स्थिती झाली होती. यानंतर सून लुस (24) व मॅरिझन केपने (29) यांनी थोडा प्रतिकार केला मात्र ठराविक अंतराने त्यादेखील माघारी परतल्या. अखेरच्या षटकांत आफ्रिका संघाला विजयासाठी 15 धावांची गरज होती पण तळाच्या फलंदाजांनी फटकेबाजीच्या प्रयत्नात विकेट फेकल्यामुळे भारतीय संघाने हा सामना 6 धावांनी जिंकला. भारताकडून एकता बिश्तने 3, दिप्ती शर्मा-राजेश्वरी गायकवेडने प्रत्येकी 2 बळी टिपले.

भारतीय महिला संघ 45.5 षटकांत सर्वबाद 146 (हरमनप्रीत कौर 38, शिखा पांडे 35, मानसी जोशी 12, केप 3/20, ईस्माईल 2/18, खाका 2/33).

दक्षिण आफ्रिका महिला संघ – 48 षटकांत सर्वबाद 140 (लॉरा वॉल्रवॉट 23, सुन ल्युस 24, केप 29, एकता बिश्त 3/32, दीप्ती शर्मा 2/24, राजेश्वरी गायकवाड 2/22).

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN