रोहितचे दमदार शतकी पुनरागमन, मयंकचाही शानदार खेळ

Indian News

Indian News

Author 2019-10-03 08:33:54

img

भारत-दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी:पावसाच्या व्यत्ययानंतरही भारताचे वर्चस्व
विशाखापट्टणम: सहा वर्षांनंतर कसोटी सामना खेळत असलेल्या रोहीत शर्माने आपल्या गुणवत्तेला न्याय देत दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात धडाकेबाज शतकी खेळी केली. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ चहापानानंतर होऊ शकला नाही, मात्र रोहीतने मयांक अगरवालच्या साथीत संघाला द्विशतकी सलामी देत वर्चस्व गाजविले.

धावफलक

भारत पहिला डाव - 59.1 षटकांत बिनबाद 202, रोहीत शर्मा नाबाद 115, मयांक आगरवाल नाबाद 84. वर्नान फिलॅंडर 11.1-2-34-0, कागीसो रबाडा 13-5-35-0, केशव महाराज 23-4-66-0, डेन पेड्‌ट 7-1-43-0, सेनुरन मुथ्थुस्वामी 5-0-23-0.

पावसाळी वातावरणामुळे सामन्यात खेळ होईल की नाही अशी शंका होती मात्र पहिल्या दोन सत्रांचा खेळ झाला.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्याचा हा निर्णय रोहीत आणि मयांक यांनी सार्थ ठरविला. विश्‍वकरंडक स्पर्धेपासून भरात असलेल्या रोहीतला कसोटी संघाची दारे का खुली होत नाहीत असा तक्रारीचा सूर देशात उमटत होता अखेर निवड समितीने त्याला सहा वर्षांनंतर संधी दिली. रोहीतने या संधीचे सोने करताना कसोटीतील चौथे शतक साकार केले. त्याने बारा चौकार आणी पाच षटकारांची आतषबाजी केली. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा रोहीत 115 धावांवर नाबाद आहे. तर त्याला तुल्यबळ साथ देताना नाबाद 84 धावांची खेळी करत मयांक आगरवालने देखील आपला दर्जा सिध्द केला. या खेळीत त्याने अकरा चौकार आणी दोन षटकार फटकावले.

फलंदाजीला सुरवात केल्यानंतर रोहीतने आपला ईरादा स्पष्ट केला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या अननुभवी गोलंदाजीचा पालापाचोळा केला. सर्व मैदानभर फटकेबाजी करत त्याने कोणताही गोलंदाज डोईजड होणार नाही याची काळजी घेतली. रोहीतच्या धडाक्‍यामुळे मयांकलाही प्रेरणा मिळाली व त्यानेही रोहीतच्या तोडीसतोड खेळ केला. सुरवातीला वेगवान गोलंदाजांना खेळपट्टी व वातावरण यांची मदत होत होती, मात्र बळी मिळविण्यात त्यांना यश येत नव्हते. कागीसो रबाडा आणि वर्नान फिलॅंडर यांनी केलेला स्वैर मारा भारताच्या पथ्यावरच पडला.

फिरकी गोलंदाज केशव महाराज, डेन पेट आणि सेनरन मुथ्थुस्वामी यांना खेळपट्टीकडून कोणतीच मदत मिळत नव्हती. त्याचाच लाभ घेत रोहित व मयांकने भारताच्या डावास आकार दिला. पहिल्या सत्रात भारताने 91 धावा नोंदविल्या. गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर ही धावसंख्या या फलंदाजांचे यश नेमके अधोरेखीत करते. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीने आक्रमक क्षेत्ररक्षण लावले होते, मात्र तरी देखील फलंदाजांवर कोणताही दबाव पडला नाही. भारतीय संघाने सामन्याच्या पहिल्या दिवसातील दोन्ही सत्रात आपले वर्चस्व राखले. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ लवकर थांबवावा लागला अन्यथा मयांकचे कसोटीतील पहिले शतक पूर्ण झाले असते. मयांकने आक्रमकता आणि तंत्रशुध्द फलंदाजीचे दर्शन घडविले. रोहितने मयांकच्या साथीत संघाला कसोटी सामन्यांच्या इतिहासातील तेरावी द्विशतकी सलामी दिली.

मुथ्थुस्वामीची अनोखी स्वप्नपूर्ती
आफ्रिकेचा सेनुरन मुथ्थुस्वामी याची या सामन्याद्वारे कसोटी पदार्पणाचे स्वप्न साकार झाले. भारतीय वंशाच्या मुथ्थुस्वामीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न होते, मात्र हे स्वप्न साकार झाले ते भारतीय संघाकडून नव्हे तर आफ्रिकेकडून खेळताना. आफ्रिका 'अ' संघाकडून त्याने भारताचा दौरा केला होता. त्याचे कुटुंबीय तमिळनाडूचे असून ते आफ्रिकेत स्थायिक झाले आहेत. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने 129 बळी घेतले असून 3 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आफ्रिकेत राहात असलो तरी नाळ भारतीयच असल्याचे तो अभिमानाने सांगतो.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN