रोहितचे सलग दुसरे शतक

Indian News

Indian News

Author 2019-10-06 08:30:57

img

भारताकडे मोठी आघाडी ः दक्षिण आफ्रिकेच्या 431 धावा, अश्‍विनचे 7 बळी

विशाखापट्टणम: सलामीवीर आक्रमक फलंदाज रोहित शर्मा याने दुसऱ्या डावातही झळकावलेल्या विक्रमी शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित करत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 395 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आज चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 1 बाद 11 धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी 384 धावांची आवश्‍यकता आहे.

आज भारताचा दुसरा डाव सुरू झाल्यानंतर पहिल्या डावातील शतकवीर मयांक आग्रवाल लवकर परतला.

त्यानंतर चेतेश्‍वर पुजाराने रोहितला साथ दिली. रोहितच्या फलंदाजीसमोर कशी गोलंदाजी करावी असा प्रश्‍न दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना पडला. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातदेखील रोहितने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. तर क्षेत्ररचना कशी लावावी हे कर्णधार फाफ डुप्लेसीला कळत नव्हते.

पुजारा व रोहितने आपापली अर्धशतके पूर्ण केली. त्यानंतर पुजाराने देखील आक्रमक खेळी केली. याच प्रयत्नात तो बाद झाला. दिवसातील अखेरची काही षटके खेळून फलंदाजीचा सराव मिळावा या हेतूने कर्णधार विराट कोहलीने रवींद्र जडेजाला फलंदाजीला पाठविले. त्याच्यासह धावांचा वेग वाढवत रोहितने पहिल्या डावाची पुनरावृत्ती करताना सलग दुसरे शतक पूर्ण केले. शतक झाल्यानंतर तर रोहितच्या बॅटमधून धावांचा पाऊस सुरू झाला. मात्र याच प्रयत्नात तो केशव महाराजच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला.

रोहित बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहली मैदानात दाखल झाला. कोहलीने जडेजाच्या साथीत अर्धशतकी भागीदारी केली. जडेजा 40 धावांवर बाद झाला, त्यावेळी भारताच्या 4 बाद 286 धावा झाल्या होत्या व संघाकडे 357 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर आलेल्या अजिंक्‍य राहाणेने कोहलीसह भागीदारी करत संघाला त्रिशतकी पल्ला गाठून दिला. 4 बाद 323 धावांवर कोहलीने भारताचा दुसरा डाव घोषित केला. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाची सुरुवातदेखील निराशाजनक झाली. पहिल्या डावातील शतकवीर डिन एल्गर केवळ 2 धावांवर जडेजाच्या गोलंदाजीवर पायचित बाद झाला. अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ चार षटके आधीच थांबविण्यात आला, त्यावेळी पाहुण्यांच्या 1 बाद 11 धावा झाल्या असून विजयासाठी त्यांना आणखी 384 धावांची गरज आहे.

रवीचंद्रन अश्‍विनने सूर गवसलेल्या तळातील फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात पकडून 7 बळी घेत आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावात गुंडाळला. भारताला पहिल्या डावात केवळ 71 धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN