रोहितच्या कसोटी कारकिर्दीला ‘शतकी’ संजीवनी

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-03 06:18:00

img

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली कसोटी, पहिला दिवस : पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी भारत बिनबाद 202

विशाखापट्टणम / वृत्तसंस्था

रोहित शर्माने कसोटीत सलामीला स्वप्नवत पदार्पण करत शानदार नाबाद शतक झळकावल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बिनबाद 202 धावांची दमदार मजल गाठली. रोहित शर्मा 174 चेंडूत 115 तर मयांक अगरवाल 183 चेंडूत 84 धावांवर नाबाद राहिले. या पहिल्या दिवसाच्या खेळात पावसाचा व्यत्यय आल्यानंतर शेवटच्या पूर्ण एका सत्राचा खेळ वाया गेला.

वास्तविक, या लढतीच्या पहिल्या दिवसभरात तब्बल 80 टक्के पावसाच्या व्यत्ययाची शक्यता होती. पण, 59.1 षटकांचा खेळ झाल्यानंतर चहापानाच्या सत्रादरम्यान पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर पुढे खेळ होऊ शकला नाही. चहापानावेळी जोरदार संततधार सुरु झाल्यानंतर दिवसभरात आणखी खेळ होऊ शकणार नसल्याची अधिकृत घोषणा केली गेली.

खराब हवामानाचा व्यत्यय येण्यापूर्वी रोहित शर्माची झंझावाती खेळी मात्र मुख्य आकर्षण केंद्र ठरली. दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी पहिल्या सत्रात काही वेळा दोघाही भारतीय सलामीवीरांना चकवले होते. पण, नंतर दुसऱया सत्रात ते रोहित व मयांकसमोर पुरते निष्प्रभ ठरले.

रोहितचे उपाहारापूर्वी अर्धशतक

उपाहारापूर्वी अर्धशतक झळकावणाऱया रोहितने पुढे जोरदार हल्ला चढवत विशेषतः फिरकी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ऑफस्पिनर डॅनी पिएडेटला डीप मिडविकेटच्या दिशेने सलग षटकारांसाठी पिटाळून लावले. नंतर पदार्पणवीर फिरकीपटू सेनूरन मुथुसामीला एकेरी धावेसाठी फटकावत त्याने स्वप्नवत शतक साजरे केले. रोहितने शतक साजरे करताच कर्णधार विराट कोहलीसह ड्रेसिंगरुममधील साऱया सहकाऱयांनी उभे राहून त्याचे अभिनंदन केले. रोहितच्या 174 चेंडूतील खेळीत 12 चौकार, 5 षटकारांचा समावेश राहिला.

मयांकची समयोचित साथ

दुसऱया बाजूने मयांक अगरवालने आपल्या पहिल्या शतकाच्या दिशेने जोरदार आगेकूच करताना रोहितला समयोचित साथ दिली. त्याने केशव महाराजला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उत्तूंग षटकारही खेचला. पुढे चहापानाचे सत्र नजीक असताना आकाश काळय़ा ढगांनी व्यापून गेले आणि जोरदार संततधार सुरु झाल्याने चहापानासाठी आठ मिनिटे आधीच खेळ थांबवण्यात आला.

दोन्ही सलामीवीरांची सावध सुरुवात

तत्पूर्वी, रोहित व अगरवाल यांनी पहिल्या 30 षटकांच्या खेळात अतिशय सावध फलंदाजी करत विशेषतः कॅगिसो रबाडा व व्हरनॉन फिलँडर यांना किंचीतही यश मिळणार नाही, याची काटेकोर दक्षता घेतली व यामुळे संघाला बिनबाद 91 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने येथे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. खेळपट्टी फिरकीला पोषक ठरेल, या अपेक्षेसह दक्षिण आफ्रिकेने केशव महाराज, पिएडेट व मुथुसामी असे तीन फिरकीपटू येथे उतरवले होते.

धावफलक

भारत पहिला डाव : मयांक अगरवाल खेळत आहे 84 (183 चेंडूत 11 चौकार, 2 षटकार), रोहित शर्मा खेळत आहे 115 (174 चेंडूत 12 चौकार, 5 षटकार). अवांतर 3. एकूण 59.1 षटकात बिनबाद 202.

गोलंदाजी : व्हरनॉन फिलँडर 11.1-2-34-0, कॅगिसो रबाडा 13-5-35-0, केशव महाराज 23-4-66-0, पिएडेट 7-1-43-0, मुथुसामी 5-0-23-0. 

रबाडाविरुद्धच्या जुगलबंदीत हिटमॅनला यश

खेळाला सुरुवात झाल्यानंतर अर्थातच सारे लक्ष रोहित शर्माकडे होते आणि त्यानेही अपेक्षा पूर्ण करताना शानदार शतकी डाव साकारला. रबाडाला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चौकारासाठी फटकावत त्याने आपल्या आगमनाची वर्दी दिली. क्रीझच्या बाहेर उभे राहून फलंदाजी करत त्याने फिलँडरचा स्विंगचा मारा पुरता निष्प्रभ केला. रोहित व फिलँडर यांच्यात यादरम्यान चांगलीच जुगलबंदी रंगत गेली आणि यात रोहित यशस्वी ठरला.

वास्तविक, यापूर्वी, सराव सामन्यात फिलँडर रोहितला चकवा देण्यात यशस्वी ठरला होता. येथे मात्र रोहितने पूर्ण वर्चस्व गाजवले. चार षटकांच्या पहिल्या स्पेलमध्ये फिलँडरने दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करत रोहितला चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहित येथे सावध पवित्र्यामुळे यातून सहीसलामत बचावला आणि एकदा चेंडूवर नजर स्थिरावल्यानंतर त्याला मागे वळून पाहण्याची काही गरजच नव्हती.

नंतर त्याने केशव महाराजच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत आक्रमक फटके खेळले आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील झंझावाताची येथेही पुनरावृत्ती केली. रोहितने यापूर्वी 27 कसोटी सामने खेळले असले तरी सलामीवीर या नात्याने त्याचा हा पहिलाच सामना होता आणि तो त्याने चांगलाच गाजवला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN