रोहितला राखीव खेळाडूत ठेवणे शक्यच नाही : रहाणे 

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-09-27 12:21:18

img

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रोहित शर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात सलामीला खेळवले जाईल की नाही, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही; परंतु कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माला राखीव खेळाडूत ठेवणे फारच कठीण असते, असे मत कसोटी क्रिकेटमधील भारताचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेने व्यक्त केले. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत रोहित शर्माला सलामीला खेळवणे जवळपास निश्‍चित झाले आहे. या मालिकेसाठी के.एल. राहुलला वगळल्यानंतर रोहितच्या या नव्या जबाबदारीवर शिक्कामोर्तबही होत आहे. सलावीर रोहित शर्माबाबत विचारले असता रहाणेने थेट उत्तर देणे टाळले. रोहितला सलामीला संधी दिली जाण्याबाबत मी आता निश्‍चितपणे सांगू शकत नाही; पण तसे झाल्यास मलाही आनंद होईल. रोहितसारख्या अफलातून क्षमता असलेल्या खेळाडूला राखीव खेळाडूत ठेवणे फारच अवघड वाटते. 

रोहित शर्मा आत्तापर्यंत 27 कसोटी सामने खेळलेला असून त्याने मधल्या फळीत फलंदाजी केलेली आहे. त्याची सरासरी 40 आहे. फटकेबाजीच्या मोहात रोहितने अनेकदा विकेट गमावल्या आहेत; त्यामुळे त्याला आपले स्थान पक्के करता आलेले नाही. पण रहाणेला तसे वाटत नाही. कसोटीत संधी मिळण्यासाठी रोहित कठोर मेहनत घेत आहे. त्यातही तो जबरदस्त कामगिरी करील, असा विश्‍वास रहाणेने व्यक्त केला. 

रोहितची क्षमता आणि गुणवत्ता आपण सर्वच जाणतो. कसोटी क्रिकेट म्हणजे संयम आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुम्ही थेट व्यक्त होत असता. कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा दोन गोलंदाज एकत्रितपणे भेदक मारा करत असतात, तेव्हा तुम्ही त्यांचा आदर राखायचा असतो आणि तो काळ पार पडल्यानंतर तुमचा आक्रमक खेळ करू शकता, असे विश्‍लेषण रहाणेने केले. 

रहाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ कसोटीच खेळत असल्यामुळे त्याच्यासमोर सातत्य राखण्याचे आव्हान आहे. हे सातत्य मिळवण्यासाठी मॅचचा सराव मिळणे आवश्‍यक असते. उच्च स्तरावर खेळत असताना दर्जेदार गोलंदाजांचा सामना करावा लागत असतो; त्यामुळे सरावातही जर असे खेळण्याची संधी मिळाली तर काम सोपे होत जाते, असे रहाणे म्हणाला.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD