रोहित शर्माचे पहिले विक्रमी द्विशतक

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-21 05:30:00

img

तिसऱया कसोटीवर भारताची मजबूत पकड

वृत्तसंस्था/ रांची

विक्रमवीर रोहित शर्माने झळकवलेले पहिले द्विशतक, अजिंक्य रहाणेचे शतक, जडेजा अर्धशतक आणि साहा व उमेश यादव यांच्या उपयुक्त धावांच्या बळावर भारताने तिसऱया व अखेरच्या कसोटीच्या दुसऱया दिवशी मजबूत पकड मिळविली आहे. पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केल्यानंतर दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने 5 षटकांत 2 बाद 9 धावा जमविल्या होत्या.

रोहितने सलामीवीराची भूमिका चोखपणे पार पाडताना दणकेबाज फलंदाजी करीत पहिले द्विशतक नोंदवले. त्याने 255 चेंडूत 212 धावा फटकावताना उपकर्णधार अजिंक्य रहाणेसमवेत 267 धावांची भागीदारी केली. जडेजाचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर विराटने 7 बाद 497 धावांवर पहिला डाव घोषित केला. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविला जाण्याआधी दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात झाली असून त्यांनी 5 षटकांत 2 बाद 9 धावा जमविल्या होत्या. शमी व उमेश यादव यांनी यांनी डीन एल्गार (0) व क्विन्टॉन डी कॉक (4) यांना आपापल्या पहिल्याच षटकातच बाद केले.

रोहितचे पहिले द्विशतक

दुसरा दिवस पूर्णपणे गाजविला तो रोहितने. विशाखापट्टणममधील सलामीवीर म्हणून पदार्पणाच्या कसोटीत त्याने 176 व 127 अशी दोन्ही डावात शतके नोंदवली होती. त्याने द्विशतकी खेळीत 28 चौकार व 6 षटकार मारले. त्याने स्क्वेअर कट्स, पुल फटक्यांचा सढळ वापर करीत जमलेल्या मोजक्या प्रेक्षकांना खुश केले. 199 वर असताना लुंगी एन्गिडीचा वेगवान चेंडू त्याने प्रंटफूट पुल  अगदी सहजतेने मिडविकेट स्टँड्समध्ये षटकारासाठी भिरकावून दिला. त्यानंतर पुढच्या चेंडूवरही त्याने षटकार ठोकला. त्याचा साथीदार रहाणेही 11 वे शतक नोंदवताना भक्कम फलंदाजी केली. गेल्या तीन वर्षातील त्याचे हे पहिलेच शतक होते. याआधी ऑक्टोबर 2016 मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध इंदोरमध्ये शेवटचे शतक नोंदवले होते. रहाणेसमवेत द्विशतकी भागीदारी केल्यानंतर जडेजा (119 चेंडूत 51) व उमेश यादव (10 चेंडूत 5 षटकारांसह 31 धावा) यांनीही उपयुक्त योगदान दिले. रबाडा वगळता द.आफ्रिकेच्या अन्य गोलंदाजांनी सुमार गोलंदाजी केल्याने त्याचा पुरेपूर लाभ भारतीय फलंदाजांनी उठविला. पदार्पणवीर जॉर्ज लिंडे त्यांचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मात्र 4 बळीसाठी त्याला 133 धावा मोजाव्या लागल्या. उमेश यादवने त्याला झोडपून काढताना तब्बल 5 षटकार ठोकले. रबाडाने 85 धावांत 3 बळी टिपले.

भारतीय वेगवान गोलंदाजांनी मात्र प्रभावी मारा केला. शमीने दुसऱयाच चेंडूवर एल्गारला साहाकरवी झेलबाद केले तर डी कॉक एका अप्रतिम बाऊन्सरवर बाद झाला. साहाने योग्यवेळी झेप टाकत हा अप्रतिम झेल टिपला. डु प्लेसिस व झुबेर हामझा यांनी उर्वरित तीन षटके कशीबशी खेळून काढली. कसोंटी पदार्पण करणाऱया शाहबाज नदीमनेही दोन्ही निर्धाव षटके टाकली.

रेहित शर्माकडून सर डॉन ब्रॅडमन यांचा ‘होम’ सरासरीचा विक्रम मागे

भारतीय सलामीवीर रोहित शर्माने द्विशतक झळकावताना ऑस्ट्रेलियाचे माजी महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा 71 वर्षे अबाधित राहिलेला ‘होम’ सरासरीचा विक्रम मागे टाकला. घरच्या मैदानावर झालेल्या कसोटीत ब्रॅडमन यांनी 98.22 अशी भक्कम सरासरी नोंदवली होती. रोहितने आजच्या द्विशतकानंतर हा विक्रम मागे टाकाताना 99.84 धावांची सरासरी नोंदवली आहे. या विक्रमाच्या नोंदीसाठी किमान दहा डाव खेळलेल्या फलंदाजांना विचारात घेण्यात आले आहे.

रोहितने 19 षटकार नोंदवून विंडीजच्या हेतमेयरचा मालिकेत सर्वाधिक 15 षटकारांचा विश्वविक्रम मोडल्यानंतर त्याने 529 धावा जमवित द्विदेशीय मालिकेत पाचशेहून अधिक धावा जमविणारा पाचवा फलंदाज होण्याचा मानही मिळविला आहे. यापूर्वी सुनील गावसकर यांनी कारकिर्दीत पाचवेळा हा पराक्रम केला होता. सेहवागने 2004-05 मध्ये पाकविरुद्धच्या मालिकेत 544 धावा केल्या होत्या. रोहितने सचिन तेंडुलकर, सेहवाग व ख्रिस गेल यांच्या पंक्तीतही स्थान मिळविले असून वनडे व कसोटीत द्विशतके नोंदवणारे हे फलंदाज आहेत.

तसेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीमध्ये 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा चौथा भारतीय फलंदाज बनला आहे. याआधी सेहवाग, मयंक अगरवाल आणि विराट कोहलीने असा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे पहिल्या अगरवालने कसोटीत 215 धावांची खेळी केली होती तर कोहलीने दुसऱया कसोटीत नाबाद 254 धावांची खेळी केली होती. त्यापूर्वी सेहवागने 2008 मध्ये 319 धावांची त्रिशतकी खेळी केली होती.

संक्षिप्त धावफलक : भारत प.डाव : अगरवाल 10, रोहित शर्मा 212 (255 चेंडूत 28 चौकार, 6 षटकार), पुजारा 0, कोहली 12, रहाणे 115 (192 चेंडूत 17 चौकार, 1 षटकार), जडेजा 51 (119 चेंडूत 4 चौकार), साहा 24 (42 चेंडूत 3 चौकार), अश्विन 14, उमेश यादव 31 (10 चेंडूत 5 षटकार), नदीम नाबाद 1, शमी नाबाद एक षटकारासह 10, अवांतर 17, एकूण 116.3 षटकांत 9 बाद 497 डाव घोषित. गोलंदाजी : रबाडा 3-85, लिंडे 4-133, नॉर्जे 109, पीडेट 1-101.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD