वाढदिवस विशेष: क्रिकेटचा गंभीर शिलेदार

Indian News

Indian News

Author 2019-10-14 15:02:45

img

-आदित्य गुंड

इंग्लंडचा १९ वर्षाखालील संघ जानेवारी २००१ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता.मुंबईत झालेली पहिली कसोटी भारताने १६९ धावांनी जिंकली. दुसरी कसोटी चेन्नईला चेपॉकवर होती. इंग्लंडच्या पहिल्या डावातल्या ३९९ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव २३१ धावांवर आटोपला. इंग्लडने फॉलोऑन दिल्याने भारताने पुन्हा फलंदाजी सुरु केली. पहिल्या डावातली १६८ धावांची पिछाडी भरून काढून पुन्हा इंग्लंडला धावांचे लक्ष्यही द्यायचे होते. अशी परिस्थिती असताना त्या दोघांनीही सलामीला येत द्विशतक झळकावले. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ३९१ धावांची भागीदारी करत भारताची नैय्या पार केली. आजही १९ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही गड्यासाठी झालेली ही सर्वोच्च भागीदारी आहे.

ते खेळाडू होते विनायक माने आणि गौतम गंभीर. पुढे जाऊन गंभीर भारतासाठी खेळला. आजवर संघ कठीण परिस्थितीमध्ये अनेकदा गंभीर संघाच्या मदतीला धावून आलेला आहे. त्या सगळ्याची ही सुरुवात होती.

ह्या घटनेच्या बरोबर एक वर्ष आधी भारताच्या १९ वर्षाखालील संघाने मोहंमद कैफच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. त्या संघात त्याला स्थान मिळू शकले नव्हते. त्याने मात्र निराश न होता इंग्लंडविरुद्धच्या खेळीने आपणही कमी नसल्याचे सिद्ध केले. दरम्यान त्याने दिल्लीच्या रणजी संघात स्थान मिळवले. देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत पुढे मग भारताच्या संघातही आला.

एकदिवसीय क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात गौतमला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. परिणामी त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. पुढचा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी त्याला जवळपास दोन वर्षे थांबावे लागले. दरम्यान त्याने भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीमध्येही पदार्पण केले. तिथेही त्याची सुरुवात निराशाजनकच राहिली. पुढची दोन वर्षे तो एकदिवसीय संघात बरीवाईट कामगिरी करत आतबाहेरच राहिला.

वेस्ट इंडिजमध्ये २००७ साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारताने सपशेल माती खाल्ली. या स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळाले नाही म्हणून खरेतर गौतम नाराज झाला होता. क्रिकेट सोडून द्यावे काय? इतके नैराश्य त्याला आले. मात्र त्यातून पुन्हा बाहेर येत बांगलादेश दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत त्याने शतक काढले आणि आपल्यातील क्रिकेट अजून शिल्लक आहे हे सिद्ध केले.

या कामगिरीचा परिणाम म्हणून त्याच वर्षी झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकात त्याला भारतीय संघात संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने या स्पर्धेत ३ अर्धशतके काढली. त्यातले सर्वात महत्वाचे अर्धशतक त्याने अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध काढले. हवा मात्र इरफान पठाण, जोगिंदर शर्मा यांच्या गोलंदाजीची आणि धोनीच्या नेतृत्वगुणांची झाली. त्यांच्या कौतुकात गंभीरने ५४ चेंडूत काढलेल्या ७५ धावांकडे अनेकांचं दुर्लक्ष झालं. सामन्यातली सर्वोच्च धावसंख्या असूनही आजही टी-२० विश्वचषकातला विजय समोर आला की चर्चा जोंगिदर, इरफान आणि धोनीचीच होते.

दिल्लीने सोळा वर्षांच्या खंडानंतर २००८ मध्ये रणजीचे विजेतेपद मिळवले. त्यावेळीसुद्धा अंतिम सामन्यात चौथ्या डावात फलंदाजी करताना गौतमने नाबाद १३० धावांची खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.

त्याचवर्षी सुरु झालेल्या आयपीएलमध्ये त्याने दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना ५३४ धावा काढल्या. पुढे जाऊन कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी कर्णधार म्हणून खेळत त्याने दोन वेळेस आयपीएलचे विजेतेपदही मिळवून दिले. आजही आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारांच्या यादीत तो पहिल्या १० फलंदांजामध्ये आहे.

गौतमच्या कारकिर्दीतला हा सर्वोत्तम काळ राहिला. दिल्लीचे २००८ चे रणजी विजेतेपद, पहिल्या आयपीएलमधील जोरदार कामगिरी, २००९ मध्ये भारत सरकारकडून मिळालेला अर्जुन पुरस्कार, त्याच वर्षी आयसीसीकडून वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून मिळालेला पुरस्कार ते २०११ च्या विश्वचषकातील भारताचा विजय हे सगळे क्षण त्याच्यासाठी सोन्याचे ठरले.

मुंबईतल्या वानखेडेवर २०११ साली भारताने विश्वकरंडक जिंकला. धोनीने षटकार मारत भारताच्या विजयावर अगदी थाटात शिक्कामोर्तब केले. धोनी सामन्याचा मानकरी झाला. धोनीच्या खेळीशिवाय या सामन्यात इतर दोन खेळी अतिशय महत्वाच्या होत्या. पहिली म्हणजे जयवर्धनेचं शतक आणि दुसरी गंभीरचं हुकलेलं शतक.

लंकेची फलंदाजी झगडत असताना जयवर्धनेनं केलेली साजेशी खेळी केली. दुसरीकडे सचिन, सेहवाग लवकर बाद होऊनही गंभीरने कोहलीला हाताशी धरत ९७ धावांची खेळी केली. भारताच्या विजयाचा पाया गंभीरच्या खेळीने घातला. दुर्दैव असं की आजही हा सामना चर्चेत आला की आधी नाव धोनीचं घेतलं जातं. धोनीच्या त्या षटकाराचा इतका भारतीयांवर इतका दूरगामी परिणाम झाला आणि इथून पुढेही राहील की "२०११ च्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा कुणी केल्या?" हा प्रश्न अनेक प्रश्नमंजुषांमध्ये आजही विचारला जातो. अनेकजण आजही या प्रश्नाचं उत्तर 'धोनी' असंच देतात. तिथेच गंभीरबद्दल खरी कीव येते. संघाला गरज असताना या झुंजार खेळाडूने विराटसारख्या त्यावेळच्या नवख्या खेळाडूला हाताशी धरत किल्ला लढवला. त्याचं शतक हुकलं. ते शतक झालं असतं तर आज धोनीऐवजी किंवा धोनीइतकंच त्याचंही नाव घेतलं गेलं असतं.

दिल्लीकडून आयपीएल कारकीर्द सुरु केलेल्या गौतीला शेवटही दिल्लीकडूनच करायची इच्छा होती. त्याप्रमाणे त्याने कोलकाता संघाला आपल्याला करारबद्ध करू नये अशी विनंती केली. यावर्षीच्या हंगामात दिल्लीने त्याला करारबद्ध केले. मात्र संघाची कामगिरी अतिशय खराब झाली. संघाच्या खालावलेल्या कामगिरीची जबाबदारी घेत त्याने यावर्षीच्या आयपीएलमध्ये स्वतःहून कर्णधारपद सोडले. आपल्याऐवजी श्रेयस अय्यरने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळावी असे त्याने सुचवले. त्यानंतर मात्र त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही.

आयपीएलमध्ये आपल्या कर्णधारपदाची चुणूक दाखवलेल्या गौतमने सहा एकदिवसीय सामन्यातही भारताचे नेतृत्व केले. या सहाही सामन्यांत भारताने विजय मिळवला. कर्णधारपदी असताना आणि खेळाडू म्हणूनही गौतमच्या गरम डोक्याची कायमच चर्चा असे. आफ्रिदीबरोबरचे भांडण, शेन वॉटसन आणि इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंबरोबरचे भांडण, आयपीएलमधले विराट कोहली आणि त्याचे भांडण असे अनेक प्रसंग लक्षात राहतील. स्टार खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त करण्यात काय चूक आहे? असा प्रश्न विचारून गौतम आपल्या रागीट स्वभावाचे समर्थन करत असे. कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसांत त्याचे धोनीबरोबर वाद झाल्याचे ऐकिवात आले. धोनीने गौतीची तक्रार बीसीसीआयकडे केल्याचीही बातमी होती. खरे खोटे आजवर बाहेर आले नसले तरी गौतीला धोनीच्या राजकारणाचा फटका बसला असे ठाम मत असलेला मोठा पाठीराखा वर्ग आहे.

गौतमची एकूण कारकीर्द विचारात घेता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोटलावर केलेले द्विशतक, न्यूझीलंड विरुद्ध सामना अनिर्णित ठेवण्यासाठी लक्ष्मणबरोबर केलेली मॅरेथॉन भागीदारी, ईडन गार्डन्सवर लंकेवर विजय मिळवताना केलेल्या नाबाद १५० धावा अशा अनेक खेळी लक्षात राहतात. जेव्हा जेव्हा भारताला गरज होती तेव्हा तेव्हा त्याने किल्ला लढवत आपली भूमिका पार पाडली. सलग ५ कसोटी सामन्यांत शतक करणाऱ्या चार खेळाडूंपैकी तोदेखील एक आहे.

एखादा खेळाडू खेळाबद्दल किती गंभीर असावा तर गौतम गंभीरएवढा. अगदी त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्याचंच उदाहरण घ्या ना. दिल्लीकडून आपला शेवटचा सामना खेळतानासुद्धा संघासाठी त्याने शतक केले. आंतरराष्ट्रीय नाही तरी किमान रणजीमध्ये तरी आपल्याला फेअरवेल सामना खेळायला मिळाला याचे त्याला नक्कीच समाधान असेल.

भारताने जिंकलेल्या दोन विश्वकरंडकात गौतमचं योगदान आजही दुर्लक्षितच आहे. अधूनमधून असे लेख लिहून त्याच्या कामगिरीचं मोल सांगण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र यानंतरही या दोन्ही विश्वकरंडकाच्या आठवणी म्हणून धोनीचा षटकार आणि जोगिंदरने टाकलेले शेवटचे षटक यांचाच नंबर लागत राहील. भारतासाठी इतकी चांगली कामगिरी करुनही गौतमला त्याचे पुरेसे श्रेय कधीच मिळाले नाही. म्हणूनच यशस्वी कारकीर्द असूनही तो इथून पुढेही एक शापित शिलेदारच राहील.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN