विक्रमवीर विराटचा ‘डबल’ धमाका

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-12 06:25:00

img

दुसरीकसोटी,दुसरादिवस:भारताचाधावांचाडोंगर

सुकृत मोकाशी / पुणे

भारतीय संघाचा कर्णधार आणि ‘रनमशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱया विराट कोहलीचा द्विशतकी धमाका आणि अजिंक्मय रहाणे, रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांच्या बळावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसऱया कसोटी सामन्यात पहिल्या डावात 5 बाद 601 धावांचा डोंगर शुक्रवारी उभा केला. दुसऱया दिवसअखेर प्रतिस्पर्धी संघाचे 36 धावांत तीन गडी बाद करण्यात भारताला यश आल्याने द. आफ्रिकन संघ बॅकफुटवर गेला आहे. विशेष म्हणजे, विराटचे हे 26 वे कसोटी शतक असून, कर्णधार म्हणून 19 कसोटी शतके झळकावणाऱया ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगशी त्याने बरोबरी केली आहे.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा कसोटी सामना रंगत आहे. गुरुवारी 3 बाद 373 वरून कोहली आणि रहाणे यांनी खेळायला सुरुवात केली. सकाळच्या सत्रात गोलंदाजांना मिळणारी साथ पाहून दोघांनी सुरुवातीचा अर्धा तास संयमाने खेळून काढला. सुरुवातीला दोघांच्या बॅटचे कड घेऊन गेलेले चौकार वगळता त्यांनी गोलंदाजांना दाद दिली नाही. त्यानंतर कोहलीचा सुंदर स्ट्रेट ड्राइव्ह व रहाणेच्या सलग चौकारांनी चाहत्यांच्या डोळय़ांचे पारणे फेडले. रहाणेने आपले अर्धशतक पूर्ण करीत आपला क्लास दाखवून दिला. त्यापाठोपाठ कोहलीने फिलेंडरला स्ट्रेट ड्राईव्ह लगावत शतकाला गवसणी घातली. या दोघांनी सकाळच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची अक्षरश: परीक्षा पाहिली. उपहारापर्यंतच्या सत्रात या दोघांनी आफ्रिकेला यश मिळू दिले नाही.

विराट, अजिंक्यची 178 धावांची भागिदारी

कोहली, रहाणेने मिळून चौथ्या गडय़ासाठी 178 धावांची भागीदारी केली. उपाहारानंतर रहाणे लगेच बाद झाला. त्याने 59 धावा फटकावल्या. त्यामध्ये त्याने आठ चौकार मारले. रहाणेला केशव महाराजने बाद केले. यानंतर धावा वाढविण्याच्या दृष्टीने रवींद्र जडेजाला बढती देण्यात आली. दुसऱया बाजूला शतक पूर्ण झाल्यावर कोहलीने चौफेर फटकेबाजीला सुरुवात केली.

विराटची बरसात, जडेजासोबत 225 धावांची भागिदारी

कोहलीने आपले द्विशतक चहापानानंतर लगेचच पूर्ण केले. द्विशतकानंतर मुथुस्वामीच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये तो झेलबाद झाला. मात्र, नो बॉलमुळे    त्याला नाबाद ठरविण्यात आले. चहापानाला खेळ थांबला तेव्हा तो नाबाद 194 धावांवर खेळत होता. चहापानानंतर कोहली आणि जडेजाने 9 च्या सरासरीने आक्रमक खेळ करत स्कोअर वाढवायला सुरुवात केली. जडेजानेही वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. त्याने 91 धावांची जबरदस्त खेळी केली. त्यामध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या दोघांनी पाचव्या गडय़ासाठी 225 धावांची भागीदारी केली. विराटने 33 चौकार व 2 षटकारासह नाबाद 254 धावांची संस्मरणीय खेळी साकारताना कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. 

भारतीय गोलंदाजांपुढे द.आफ्रिकन फलंदाजांची निराशा

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. उमेश यादवने एकामागोमाग एक बळी घेत अफ्रिकेच्या सलामी जोडीला पॅव्हेलियचा रस्ता दाखवला. डीन एल्गारने 6 धावा केल्या. मॅरक्रमला भोपळाही फोडता आला नाही. तर शमीने आपल्या चेंडूवर बउमाचा अडथळा दूर केला. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आफ्रिकेने 15 षटकांत 3 बाद 36 धावा केल्या होत्या. डी ब्रुन 20 तर नोर्तजे 2 धावांवर खेळत होते. पाहुण संघ अद्याप 565 धावांनी पिछाडीवर आहे.

विराटने गावसकरांना टाकले मागे

शतकांच्याबाबतीत विराटने भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनाही मागे टाकले. पुण्यातील शतकाने सर्वांत वेगवान 26 कसोटी शतके झळकावणारा जगातील तो चौथा फलंदाज ठरला आहे. सर ब्रॅडमन यात अव्वलस्थानी आहेत. त्यांनी 69 डावात 26 कसोटी शतके झळकावली होती. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ दुसऱया, तर सचिन तेंडुलकर तिसऱया स्थानी आहे.

‘शतकवीर’ कर्णधार

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱयांच्या यादीत विराट सध्या दुसऱया स्थानी आहे. विराटने एकूण 26 शतके ठोकली असली तरी कर्णधार म्हणून त्यांच्या नावावर 19 कसोटी शतके आहेत. या यादीत ग्रॅहम स्मिथ 25 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर रिकी पॉटिंग (19) ऍलन बॉर्डर (15) आणि स्टीव्ह स्मिथ (15) चा क्रमांक लागतो.

सर ब्रॅडमन यांचा दीडशतकांचा विक्रम मोडला

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार सर डॉन ब्रॅडमन यांचा सर्वाधिक आठ दीडशतकांचा विक्रमही कोहलीने या सामन्यादरम्यान मोडित काढला. त्याच्यानंतर कर्णधार म्हणून सर्वाधिक दीडशतके ठोकण्याचा मान मायकल क्लार्क, महिला जयवर्धने, ब्रायन लारा, ग्रॅहम स्मिथ यांच्या नावावर आहे. या चौघांनीही प्रत्येकी सात दीडशतके झळकावली आहेत.

कसोटीत भारतातर्फे सर्वाधिक द्विशतके

आफ्रिकेविरुद्ध विराटने नाबाद 254 धावांची खेळी साकारताना मास्टर ब्लास्टर सचिन व सेहवागचा कसोटी द्विशतकांचा विक्रम मोडित काढला. सचिन व सेहवागच्या नावावर कसोटीत सहा द्विशतके आहेत. सचिनने 200 कसोटी सामने खेळताना तर सेहवागने 104 कसोटी सामन्यांत ही कामगिरी केली होती. विराटने 81 कसोटी सामने खेळताना अवघ्या 138 डावांमध्ये हा पराक्रम केला आहे.

द्विशतके कसोटी

विराट कोहली      7          81

सेहवाग               6         104

सचिन तेंडुलकर   6         200

राहुल द्रविड                    5         164

विराटच्या सर्वांत जलद 7 हजार धावा

विराटने 50 व्या कसोटीत 7 हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने वीरेंद्र सेहवाग (134 डाव) आणि सचिन तेंडुलकर (136 डाव) यांना मागे टाकले असून, गॅरी सोबर्स आणि कुमार संगकारा यांच्यासोबत तो संयुक्त चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे. या यादीत विंडीजचे वॉली हेमंड हे अग्रस्थानी असून त्यांनी केवळ 131 डावात 7000 धावांचा टप्पा गाठला होता.

केशव महाराजचे कसोटीत 100 बळी, खांद्याला दुखापत

केशव महाराजने कसोटीत शंभर बळी पूर्ण केले. अजिंक्मय रहाणे हा महाराजचा शंभरावा बळी ठरला. दरम्यान, केशव महाराज याच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याच्या खांदय़ाचे स्कॅन करण्यासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

संक्षिप्त धावफलक : भारत 5 बाद 601 घोषित : विराट कोहली नाबाद 254 (336 चेंडूत 33 चौकार, 2 षटकार), मयांक अगरवाल 108 (16 चौकार, 2 षटकार), रहाणे 59, रवींद्र जडेजा 91 (8 चौकार, 2 षटकार), गोलंदाजी : रबाडा 3/93, मुथुस्वामी 1/97. दक्षिण आफ्रिका पहिला डाव 3 बाद 36 : डीन एल्गार 6, मॅरक्रम 0, डी ब्रुयेन नाबाद 20, नोर्तजे नाबाद 2, उमेश यादव 2/20, मोहम्मद शमी 1/3

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD