विजय हजारे चषक स्पर्धेत कर्नाटक विजेता

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-26 05:40:00

img

एकतर्फी अंतिम लढतीत तामिळनाडूला नमवले, केएल राहुल, हॅट्ट्रिकवीर अभिमन्यू मिथुनचे निर्णायक योगदान

बेंगळूर / वृत्तसंस्था

केएल राहुलने यष्टीरक्षक-फलंदाजाच्या भूमिकेसाठी आपली दावेदारी आणखी एकदा निश्चित केल्यानंतर व बर्थडे बॉय अभिमन्यू मिथुनच्या शेवटच्या षटकातील हॅट्ट्रिकच्या बळावर यजमान कर्नाटकने विजय हजारे चषक स्पर्धेच्या जेतेपदावर आपली मोहोर उमटवली. पावसाने व्यत्यय आलेल्या या लढतीत डकवर्थ लुईसऐवजी जयवर्धन (व्हीजेडी) मेथडने कर्नाटकला 60 धावांनी विजयी घोषित केले गेले.

तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्वबाद 252 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात कर्नाटकने 23 षटकात 1 बाद 146 धावा केल्या असताना पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबला. व्हीजेडी पद्धतीनुसार कर्नाटकला यावेळी 23 षटकात 87 धावांची आवश्यकता होती. यामुळे, कर्नाटकचा संघ 60 धावांनी विजयी ठरला.

मिथुनने लिस्ट ए सामन्यात प्रथमच 5 बळी घेण्याचा पराक्रम गाजवला. यात डावातील शेवटच्या षटकात घेतलेल्या हॅट्ट्रिकचा समावेश होता. त्याने एम. शाहरुख खान, एम. मोहम्मद व मुरुगन अश्विन यांना सलग चेंडूवर बाद करत हॅट्ट्रिक साधली आणि तामिळनाडूचा संघ 49.5 षटकात 252 धावात आटोपला.

एमएसके प्रसादच्या नेतृत्वाखालील निवड समितीने यापूर्वी गुरुवारी राहुलचा बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिकेसाठी संघात समावेश केला आहे. धोनीऐवजी आपले पंतला प्राधान्य असेल, असे त्यांनी म्हटले असले तरी या स्पर्धेतील उपांत्य व अंतिम लढतीत यष्टीरक्षक-फलंदाजाची भूमिका चपखलपणे निभावत राहुलने एक पाऊल जणू पुढे टाकले आहे.

राहुलची फलंदाजीतील गुणवत्ता निर्विवाद राहिली असून पावसाने रद्द केल्या गेलेल्या येथील अंतिम लढतीत त्याने 72 चेंडूत नाबाद 52 धावांचे योगदान दिले. सहकारी सलामीवीर देवदत्त पडिक्कल (11) स्वस्तात बाद झाला. तरी राहुलने मयांकसमवेत दुसऱया गडय़ासाठी 112 धावांची भागीदारी साकारली. राहुल याचप्रमाणे यष्टीरक्षणातही अव्वल प्रदर्शन साकारु शकला तर 1999 विश्वचषक स्पर्धेत ज्याप्रमाणे द्रविडने यष्टीरक्षक-फलंदाजाची भूमिका पार पाडली होती, त्याप्रमाणे समयोचित योगदान केएल राहुल देऊ शकेल का, हे पाहणे रंजक ठरेल. मयांकने 55 चेंडूत नाबाद 69 धावा फटकावल्या.

शुक्रवारी येथे कर्नाटकला व्हीजेडी पद्धतीनुसार विजेते ठरवण्यात आले. प्रथमश्रेणी सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास ही पद्धत अंमलात आणली जाते. कर्नाटकसाठी या स्पर्धेचे हे चौथे जेतेपद असून यापूर्वी 2013-14, 2014-15 व 2017-18 या वर्षात त्यांनी येथे विजेतेपद संपादन केले होते.

तामिळनाडूला या स्पर्धेत पाचवेळा जेतेपद मिळविण्याचा अनुभव आहे. पण, येथे त्यांना उपजेतेपदावर समाधान मानावे लागेल. तामिळनाडूतर्फे अभिनव मुकुंद (86) व नवोदित बाबा अपराजित (66) यांनाच तडफदार अर्धशतके झळकावता आली. विजय शंकर (38) व शाहरुख (27) यांना उत्तम सुरुवात केल्यानंतर त्याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आले नाही.

संक्षिप्त धावफलक

तामिळनाडू : 49.5 षटकात सर्वबाद 252. (अभिनव मुकुंद 110 चेंडूत 9 चौकारांसह 85, बाबा अपराजित 84 चेंडूत 7 चौकारांसह 66, एम. शाहरुख खान 23 चेंडूत 1 षटकारासह 27. अवांतर 5. अभिमन्यू मिथुन 9.5 षटकात 34 धावात 5 बळी, व्ही. कौशिक 2-39, जैन, के. गौतम प्रत्येकी 1 बळी).

कर्नाटक (व्हीजेडी मेथडनुसार सुधारित टार्गेट- 23 षटकात 87): 23 षटकात 1 बाद 146. (मयांक अगरवाल 55 चेंडूत 7 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 69, केएल राहुल 72 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 52, दीपक पडिक्कल 11. वॉशिंग्टन सुंदर 6 षटकात 1-51). 

आमच्या संघाने या स्पर्धेतील सर्वच सामन्यात विजय संपादन करायचा, या जिद्दीनेच खेळ साकारला आणि याचमुळे आम्ही जेतेपदावर मोहोर उमटवू शकलो. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये यापुढेही हीच घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल.

-कर्नाटकचा कर्णधार मनीष पांडे

आमच्या संघातील खेळाडूंनी अंतिम फेरीपर्यंत अतिशय दमदार खेळ साकारला होता. शुक्रवारी फायनलचा दिवस आमचा नव्हता. पण, एका प्रतिकूल निकालामुळे संघ खराब ठरत नाही. टी-20 व रणजी स्पर्धेसाठी येथील अनुभव आमच्यासाठी मोलाचा ठरेल.

-तामिळनाडूचा कर्णधार दिनेश कार्तिक

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN