विराटच्या पावलावर पाऊल टाकणार – रोहित
नवी दिल्ली । भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून तीन टी-20 सामन्यास सुरुवात होत आहे.आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर पहिला टी-20 सामना होणार आहे. सामन्याच्या पुर्वसंध्येला भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने मालिकेत नेतृत्व करताना विश्रांती घेत असलेला कर्णधार विराट कोहलीच्या पावलावर पाऊल टाकतच काम करणार असल्याचे सांगितले. तसेच तो बांगला देशाच्या संघाला कमी लेखण्यास तयार नाही.
रोहित पहिल्या सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलतांना म्हणाला, ‘माझी कर्णधार म्हणून भूमिका सर्वात सोपी आहे. विराट संघाला जेथून सोडून गेला आहे, तेथूनच संघाला पुढे जायचे आहे. कर्णधार म्हणून मिळालेल्या अल्प संधीत अजून काय करु शकतो? जे विराट करत होता तेच पुढे नेणार आहे.’ याच बरोबर रोहितने बांगला देश संघाला कमी लेखणार नाही, असेही सांगितले. तो म्हणाला बांगला देश हा उत्तम संघ आहे. काही वर्षांपासून ते फक्त मायदेशातच नाही तर परदेशातही चांगली कामगिरी करत आहेत. ते कायम आमच्याविरुध्द चांगली कामगिरी करतात आणि आम्हाला दबावात टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना हलक्यात घेणार नाही. शाकिब आणि तमिम संघात नाही याबद्दल रोहित म्हणाला की, त्यांचे दोन महत्त्वाचे खेळाडू खेळणार नाहीत याची कल्पना आहे, पण तरीही त्यांच्याकडे गुणी खेळाडूंचा भरणा आहे.