विराटच्या सूचनेला अनिल कुंबळेंचे पाठबळ
देशातील फक्त 5 ठिकाणी कसोटी खेळवण्याचा मुद्दा, रांचीतील अल्प प्रतिसादाचा परिणाम
बेंगळूर / वृत्तसंस्था
माजी भारतीय कर्णधार व प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी विराट कोहलीच्या फक्त पाचच ठिकाणी कसोटी क्रिकेट खेळवण्याच्या सूचनेला पाठबळ दर्शवले. चाहत्यांनी पुन्हा कसोटी क्रिकेटकडे वळायचे असेल तर मोजक्याच ठिकाणी कसोटी सामने होणे महत्त्वाचे ठरेल, असे कुंबळे याप्रसंगी म्हणाले. अलीकडेच भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील रांची कसोटी सामन्याकडे चाहत्यांनी पाठ फिरवली, त्यानंतर विराटने याबाबत सूचना मांडली होती.
1980 व 1990 च्या दशकात बीसीसीआयने कसोटी क्रिकेटला उत्तम स्थितीत आणले होते. त्यावेळी कसोटी सामने ठरावीक ठिकाणीच व्हायचे आणि कसोटी क्रिकेट हा जणू एक सोहळा असायचा. याची कुंबळेंनी यावेळी आठवण करुन दिली. 1980 व 1990 च्या दशकात नव्या वर्षातील पहिली कसोटी कोलकाता येथे व्हायची तर पोंगलवेळी एक कसोटी चेन्नईत होत असे.
‘कसोटी क्रिकेटला संजीवनी देणे, गतवैभव प्राप्त करुन देणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे, मोजक्या ठिकाणीच कसोटी क्रिकेट खेळवण्याबरोबरच ते योग्य, अनुकूल वेळेत खेळवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे’, असे कुंबळे शनिवारी म्हणाले.
‘पोंगलच्या दरम्यान कसाटी चेन्नईमध्येच व्हायची, हंगामाची सुरुवात दिल्लीत होत असे आणि बेंगळूर, कोलकातामध्येही कसोटी होत असे’, याचा जम्बोने पुढे उल्लेख केला.
मागील आठवडय़ाच्या प्रारंभी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्याला रांचीत अतिशय अल्प प्रतिसाद लाभला आणि त्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीने भविष्यात इंग्लिश व ऑस्ट्रेलियन मॉडेलप्रमाणे फक्त पाचच ठिकाणी कसोटी खेळवले जावे, असे मत मांडले होते.
दिवस-रात्र कसोटी महत्त्वाचे ठरेल
आयपीएल फ्रँचायझी किंग्स इलेव्हन पंजाबसाठी क्रिकेट ऑपरेशन्स संचालक म्हणून 49 वर्षीय कुंबळे पुन्हा प्रशिक्षणाच्या ट्रकवर परतले असून भारताने नजीकच्या कालावधीत दिवस-रात्र कसोटी क्रिकेट खेळावे, अशी सूचना त्यांनी केली.
‘कसोटी क्रिकेट दिवस-रात्र स्वरुपात खेळवले गेले तर निश्चितच चाहते या अव्वल क्रिकेट प्रकाराकडे वळतील. पण, वनडे सामनेही दिवस-रात्र खेळवले जात असल्याने यात योग्य ते अंतर ठेवणे आवश्यक असेल. दिवस-रात्र क्रिकेटमध्ये चेंडू दव असल्याने लवकर ओलसर होतो. त्यामुळे, याचीही योग्य ती दखल घेत वर्षातील कोणत्या वेळी व कोणत्या ठिकाणी असे सामने भरवावेत, त्याचा बिनचूक निर्णय होणे आवश्यक ठरते’, असे कुंबळे पुढे म्हणाले.
भारताचा सलग मालिकाविजय
सध्या जागतिक कसोटी मानांकन यादीत विराजमान असणाऱया भारतीय संघाने अलीकडेच संपन्न झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत 3-0 असा व्हॉईटवॉश केला असून त्यापूर्वी विराटसेना विंडीज व ऑस्ट्रेलियन भूमीतही लागोपाठ मालिकाविजय संपादन करण्यात यशस्वी ठरली होती. अगदी विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये देखील भारत 240 गुणांसह आघाडीवर आहे.
‘तीन वर्षांपूर्वी प्रशिक्षक असतानाही मी भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम वर्चस्व गाजवत राहील, असे भाष्य केले होते आणि तेच झाले आहे. भारताचा केवळ 11 सदस्यीय संघच नव्हे तर राखीव खेळाडूंची फळीही अतिशय मजबूत आहे. त्यामुळे, 11 सदस्यीय संघात जो खेळाडू येतो, तो दमदार प्रदर्शन साकारण्यात निश्चितपणाने यशस्वी होतो’, असे कुंबळे शेवटी म्हणाले.
…तरच कसोटीचे मार्पेंटिंग शक्य
‘देशातील निवडक पाचच ठिकाणी कसोटी क्रिकेट सामने होणार आहेत, हे स्पष्ट असल्यास या कसोटी लढतींचे उत्तम मार्केटिंग केले जाऊ शकते. मी स्वतः ज्यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होतो, त्यावेळी देशातील सहा विविध ठिकाणी संघाचे कसोटी सामने खेळवले गेले. यात इंदोरचाही समावेश होता. इंदोरमध्ये त्यावेळी चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. कसोटी क्रिकेटला संजीवनी लाभण्यासाठी असा प्रतिसाद महत्त्वाचा ठरतो’, असे कुंबळेनी नमूद केले.