विश्वचषकातील पाऊस आणि इतिहास

Maha Sports

Maha Sports

Author 2019-06-15 07:40:01

img

-शरद बोदगे

आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ हा सध्या इंग्लंड देशात सुरु आहे. क्रिकेट जगतात मानाचे स्थान असलेल्या स्पर्धेचे हे १२पर्व. भारतात २०१९ आय़पीएलचा हंगाम संपल्यानंतर तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष या विश्वचषकाकडे लागले आहे. कारणही तसेच आहे. अशा स्पर्धा ह्या काही रोज रोज किंवा दरवर्षी होत नाही. चार वर्षातून एकदा येणारी आणि आयसीसीच्या कॅलेंडरमध्ये अतिशय मानाचे स्थान असणारी ही स्पर्धा.

याची तिकीट विक्री अगदी दीड-दोन वर्षांपुर्वी सुरु झालेली. सहाजिकच जगभरातील चाहत्यांनी या स्पर्धेतील सामने पहाण्याबरोबर इंग्लंडसारखा सुंदर देश फिरताना पर्यटनाचा आनंद घेता येईल हा विचार देखील केलेला. पांरपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तानच्या सामन्याची तिकीटं तर २४ तासांच्या आतच संपली. अनेकांनी त्यासाठी अनेक महिने आधी तयारी करुन सुट्ट्यांचे नियोजन देखील केले आहे.

असं सर्व ठिक सुरु असताना ३० मे रोजी सुरु झालेल्या या स्पर्धेला ४ जून रोजी अफगाणिस्तान-श्रीलंका सामन्यावेळी ग्रहण लागले. वरुण राजाच्या कृपेने सामना ४१ षटकांचा करावा लागला. जेमतेम ६ सामने व्यवस्थित पार पाडल्यानंतर हे भलतेच विघ्न समोर उभे राहिले. नशिब हा सामना तरी पुर्ण झाला. परंतु यानंतर सुरु झाली ती वनडे विश्वचषकात पावसाची ‘कसोटी’.

७ जून रोजी पाकिस्तान-श्रीलंका, १० जून रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, ११ जून रोजी बांगलादेश-श्रीलंका आणि १३ जून रोजी भारत-न्यूझीलंड असे तब्बल चार सामने रद्द करावे लागले. यातील तीन सामन्यात तर नाणेफेक देखील झाली नाही. दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज या सामन्यात जेमतेम ७.३ षटकांचा खेळ झाला.

पावसामुळे विश्वचषकात सामने रद्द होण्याचा इतिहास-

यापुर्वी ११ विश्वचषक मिळून केवळ दोन वेळा पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामने रद्द झाले आहेत. याचा अर्थ १९७५ ते २०१५ या काळात ५०षटकांच्या विश्वचषकात झालेल्या तब्बल ८०० सामन्यांपैकी केवळ २ सामने पावसामुळे अशाप्रकारे रद्द झाले होते. परंतु या विश्वचषकात गुरुवारपर्यंत १८ सामन्यांत ४ सामने अशाप्रकारे रद्द होऊन नवा विश्वविक्रम झाला आहे.

आयसीसीची उडविली टर-

आजपर्यंतच्या विश्वचषकांचा जर विचार केला तर यावेळी सोशल माध्यमांचा वापर सर्वाधिक होतोय. जरी २०१० पासून आयसीसीने सोशल मीडियावर पाय रोवायला सुरुवात केली असली तरीही २०१६पासून या माध्यमावर चाहत्यांप्रमाणेच आयसीसीनेही आपले हॅंडल चांगल्याप्रकारे कार्यान्वित केले आहे. परंतु जेव्हापासून या विश्वचषकात पावसामुळे सामने रद्द होऊ लागले आहेत तेव्हापासून चाहत्यांनी आयसीसीला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका भारतीय चाहत्याने तर ‘पावसाळ्यात इथे आपण लग्न ठेवत नाही…आणि यांनी वर्ल्डकप ठेवला आहे.’ अशी टर उडवली आहे. #ShameOnICCअसा ट्रेंड यावेळी चाहत्यांनी सोशल मीडियावर सुरु केला आहे. काहींनी तर विश्वचषकाच्या ट्राॅफीलाच छत्रीने झाकून नवा लोगो तयार केला आहे. काही चाहत्यांनी पाऊस आणि विश्वचषकावर आधारित मीम्स तयार केले आहेत.

आयसीसीने दिले स्पष्टीकरण-

यावेळी चाहत्यांनी राखीव दिवस ठेवण्याची ओरड केली आहे. परंतु रद्द झालेल्या सामन्यांसाठी राखीव दिवस न ठेवण्याचे कारण आयसीसीचे सीईओ डेव रिचर्डसन यांनी स्पष्ट केले आहे. ‘आयसीसीने विश्वचषकात जर प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला असता तर स्पर्धा खूप मोठी झाली असती आणि व्यावहारिकपणे त्याचा अवलंब करणे अत्यंत कठिण गेले असते.’ असे ते यावेळी म्हणाले. ‘याचा परिणाम खेळपट्टी तयार करणे, संघाच्या रिकव्हरी आणि प्रवासाच्या दिवसावर तसेच महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांवर जे अनेक तासांचा प्रवास करुन सामना पहायला आलेले असतात, त्यावर होईल. तसेच राखीव दिवशीही पाऊस न पडण्याची कोणती खात्री नसते.’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

होणार मोठे नुकसान-

क्रिकेट हा पहिल्या सारखा खेळ राहिला नाही. या खेळाच्या सर्वच गोष्टींमध्ये आता आर्थिक गणितं दडलेली आहे. प्रत्यक्ष मैदानावर येऊन सामना पहाणारे प्रेक्षक, त्यामुळे त्या देशात पर्यटनातून येणारा पैसा, या विश्वचषक प्रसारित करणाऱ्या वाहिन्या, त्यांचे जाहिरातदार, डिजीटल ब्राॅडकास्टिंग तसेच त्याची आर्थिक गणितं, विश्वचषक रटाळ झाल्यामुळे प्रेक्षकांची संख्या रोडावणे अशा अनेक गोष्टींचा यावर परिणाम होणार आहे. यातून आयसीसीच्या महसुलावर मोठा परिणाम होणार आहे.

काय आहेत उपाय-

हा विश्वचषक इंग्लंड आयोजीत करणार हे २००६ रोजीच ठरले होते. परंतु त्यादृष्टीने पावसाचा विचार करुन कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. १२ महिन्यांपैकी जून महिन्यात इंंग्लंडमध्ये वर्षातील सरारीच्या तिसरा सर्वात कमी पाऊस पडतो. परंतु यावेळी तसे घडले नाही. यजमान इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानेही पावसाला गृहित धरले. आणि याचाच परिणाम म्हणजे हे रद्द झालेले सामने. १२-१३ वर्षांत कोणतीही तयारी न करता आल्याचा राग आता प्रेक्षकांमधून आवळला जात आहे. यापुढील विश्वचषक भारतात होणार आहेे. त्याच्या तारखा जरी आल्या नसल्या तरी हा विश्वचषक ऑक्टोबर ते मे या काळातच खेळवला जाईल. भारतात या काळात पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी असते. तरीही यजमान देशाने तशी काळजी घेतली पाहिजे. तसेच विश्वचषक आयोजनाचा मान देताना वातावरण, तसेच त्यावर उपलब्ध असलेल्या पर्यांयांचा आयसीसीने गांभिर्याने विचार करायला हवा. नाहीतर क्रिकेट जगातातील एवढ्या मानाच्या स्पर्धेचे तीन-तेरा वाजल्याशिवाय राहणार नाही.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD