व्यवस्थापनाकडून कोणताही दबाव नाही -चहल
पुढील वर्षी रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी युवा खेळाडूंकडून मोठय़ा प्रमाणात अपेक्षा बाळगल्या जात आहेत. मात्र आमच्यावर संघ व्यवस्थापनाकडून कोणतेही दडपण नाही. फक्त चुकींची पुनरावृत्ती होऊ नये, हेच त्यांचे म्हणणे आहे, असे लेगस्पिनर यजुर्वेद्र चहल याने स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेवर आतापासूनच लक्ष केंद्रित करत भारताने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. ‘‘अंतिम ११ जणांच्या संघामध्ये जे खेळत आहेत व जे १५ जणांच्या चमूत आहेत, त्यांना आपापल्या भूमिकांची जाणीव आहे. एक-दोन सामन्यानंतर कुणीही संघाच्या बाहेर जाऊ शकत नाही. काही सामन्यांत वाईट कामगिरी झाली तरी संघ व्यवस्थापनाकडून आमच्यावर दडपण नसते. फक्त गेल्या सामन्यातील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, इतकेच त्यांचे म्हणणे असते,’’ असे चहल म्हणाला.
‘‘या मालिकेत आम्ही सकारात्मक वृत्तीने खेळत आहोत. मालिकेत पहिला सामना आम्ही हरलो आहोत, हे पहिल्यांदा घडले नाही. त्यानंतरही आम्ही मालिका जिंकली आहे,’’ असेही चहलने सांगितले.