शकीब हसनचा एमसीसी क्रिकेट समितीचा राजीनामा

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-31 03:19:00

img

आयसीसीच्या निलंबनानंतर स्वतःहून बाहेर पडण्याचा निर्णय

लंडन / वृत्तसंस्था

बुकींकडून वारंवार संपर्क झाल्यानंतरही त्याची माहिती न दिल्याने दोन वर्षांच्या बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागलेल्या बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार, स्टार अष्टपैलू शकीब-अल-हसनने बुधवारी एमसीसी विश्व क्रिकेट समितीतून राजीनामा दिला. एमसीसी (मॅरिलबोन क्रिकेट क्लब) क्रिकेट समिती क्रिकेट खेळाचे नियम निश्चित करते व त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख करते. एमसीसीने परिपत्रक जारी करत त्यात शकीब बाहेर पडत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

32 वर्षीय शकीबवर आयसीसीने दोन वर्षांची बंदी लादली असून यातील एक वर्षाची निलंबित बंदी असेल. संशयित भारतीय बुकी दीपक अगरवालने सातत्याने संपर्क साधल्यानंतरही याची आयसीसी भ्रष्टाचार प्रतिबंधक युनिटला माहिती न दिल्याचा शकीबवर ठपका होता आणि तो त्याने कबूल केला. या कबुलीमुळे तो शिक्षेविरोधात अपील करु शकणार नाही, हे देखील स्पष्ट झाले. शकीब हसनने ऑक्टोबर 2017 मध्ये एमसीसी विश्व क्रिकेट अकादमीचे सदस्यत्व स्वीकारले होते. नंतर तो सिडनी व बेंगळूर येथे झालेल्या एमसीसी बैठकांनाही हजर राहिला होता.

एमसीसी विश्व क्रिकेट समितीत आजी-माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू, जागतिक स्तरावरील विविध पंचांचा समावेश असून या समितीची दर दोन वर्षानी बैठक होते आणि त्यात प्रामुख्याने खेळातील ज्वलंत समस्या, मुद्दे यावर चर्चा केली जाते. या समितीची पुढील बैठक मार्च 2020 मध्ये श्रीलंकेत होणार आहे.

जागतिक वनडे अष्टपैलू मानांकन यादीत अव्वलस्थानी विराजमान असणाऱया शकीब हसनकडे अगरवाल या भारतीय बुकीकडून संघातील खेळाडू व संघाची धोरणे याबाबत माहितीसाठी संपर्क साधला गेला होता. 2018 आयपीएलमध्ये शकीब सनरायजर्स हैदराबादकडून खेळत असताना किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध अगरवालने त्याच्याशी संपर्क साधला. सनरायजर्स संघाने तो सामना 13 धावांनी जिंकला.

त्यापूर्वी 2017 बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धा व नंतर जानेवारी 2018 मध्येही अगरवाल व शकीबमध्ये संभाषण झाल्याचे उघडकीस आले. अगरवालने त्यावेळी शकीबशी प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा दर्शवली. पण, शकीबने त्यावेळी नकार दिला होता.

सध्या बांगलादेशचा संघ भारत दौऱयावर असून टी-20 सामन्याने रविवारी मालिकेला सुरुवात होत आहे. त्यानंतर उभय संघात कसोटी मालिकाही रंगणार आहे. अर्थातच, बांगलादेश संघाला शकीब हसनची यापुढे सातत्याने उणीव जाणवत राहणे साहजिक मानले जाते.

कोटस

‘शकीब या समितीतून बाहेर पडतो आहे, हे वेदनादायी आहे. मागील काही वर्षात त्याने अतिशय उत्तम योगदान दिले. पण, आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. त्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असेल.’

-एमसीसी विश्व क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष माईक गॅटिंग.

माझ्या मते शकीब हसनवर आणखी कठोर कारवाई होणे गरजेचे होते. सध्या सर्वच खेळाडूंना नियम पूर्णपणे माहीत असतात आणि एखादा खेळाडू चक्क दोन वर्षे याबाबत मौन पाळतो, हे अतिशय गंभीर स्वरुपाचे आहे.

-माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉन

शकीब हसनवर झालेली कारवाई योग्यच आहे. या कारवाईमुळे सर्व खेळाडूंना आपण किती जागरुक रहायला हवे, याचे धडे मिळतील. क्रिकेटपेक्षा आपण मोठे होण्याचा शकीबचा प्रयत्न लाजीरवाणा आहे.

-पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीज राजा

प्रत्येक महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी, विश्वचषक स्पर्धेपूर्वी आयसीसी खेळाडूंना नियमांची माहिती देत असते. खेळाडूंना आणखी किती व्याख्याने द्यायची आणि आणखी किती जागरुकता करायची, हा आयसीसीसमोर प्रश्न आहे. अन्य खेळाडूंनी यापासून योग्य तो धडा घ्यावा.

-माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज डीन जोन्स

शकीब हसनची चौकशी सुरु आहे, याची आमच्या मंडळातील कोणालाच किंचीतही कल्पना नव्हती. शकीबने वेळीच कल्पना दिली नाही, याचा राग आम्हाला आहेच. पण, सध्या तो चौकशीला सहकार्य करत आहे, यामुळे थोडाफार दिलासा आहे.

-बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नझमूल हसन

शकीबसारखा अतिशय प्रगल्भ खेळाडू इतकी गंभीर बाब लपवून ठेवू शकतो, यावर आमचा विश्वासच बसत नाही. शकीब प्रत्यक्ष मैदानावर एक वर्ष दिसणार नाही आणि ही बाब पचवणे मानसिकदृष्टय़ा अतिशय कठीण असते. त्याचे पुनरागमन निश्चितच कठीण असेल.

-बांगलादेशचे राष्ट्रीय निवडकर्ते हबिबूल बशर

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN