शांता रंगास्वामी यांचा राजीनामा!
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नीती अधिकारी डी. के. जैन यांनी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे शांता रंगास्वामी यांनी क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी) सदस्य आणि भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनच्या (आयसीए) संचालकपदाचा राजीनामा दिला.
‘‘भविष्यासाठी मी काही योजना आखल्या असून आता पुढे वाटचाल करण्याची वेळ आली आहे. पण क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम पाहताना परस्पर हितसंबंधाचा मुद्दा कुठे आड आला, हेच मला समजलेले नाही,’’ अशा शब्दांत रंगास्वामी यांनी नाराजी व्यक्त केली.
माजी कर्णधार कपिलदेव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीत अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी यांचा समावेश होता. रंगास्वामी यांनी रविवारी सकाळीच आपले राजीनामापत्र प्रशासकीय समिती आणि बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवले आहे. नीती अधिकारी डी. के. जैन यांनी सीएसीच्या सर्व सदस्यांना नोटीस पाठवली असून १० ऑक्टोबपर्यंत आपले उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे आजीव सदस्य संजीव गुप्ता यांनी भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करणाऱ्या सल्लागार समितीच्या तिन्ही सदस्यांविरोधात तक्रार केली आहे. बीसीसीआयच्या आचारसंहितेनुसार, कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी सारखेच पद भूषवता येणार नाही. सीएसीचे सदस्यही अनेक भूमिका भूषवत आहेत, असा दावा गुप्ता यांनी तक्रारीत केला आहे.
भारताला १९८३च्या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देणारे कर्णधार कपिलदेव हे समालोचक, एका फ्लडलाइट्स कंपनीचे मालक, इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे सदस्य त्याचबरोबर क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. गायकवाड यांच्या मालकीची अकादमी असून ते बीसीसीआयच्या संलग्नता समितीचे सदस्य आहेत. रंगास्वामी यासुद्धा सीएसी आणि आयसीएमध्ये विविध भूमिका निभावत आहेत, असे गुप्ता यांनी तक्रारीत म्हटले आहे.
क्रिकेट सल्लागार समितीने (त्या वेळची अस्थायी समिती) डिसेंबर महिन्यात डब्ल्यू. व्ही. रामन यांची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. शास्त्री यांनी दुसऱ्यांदा दोन वर्षांच्या कालावधीसाठी मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. भारताचे प्रशिक्षकपद सांभाळण्याची शास्त्री यांची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी क्रिकेट व्यवस्थापक (२००७चा बांगलादेश दौरा), संघ संचालक (२०१४-२०१६) आणि मुख्य प्रशिक्षक (२०१७-२०१९) अशा भूमिका निभावल्या आहेत.
हितसंबंध दिसत नाहीत -राय
कपिलदेव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची निवड करताना कोणत्याही प्रकारचे परस्परहितसंबंध ठेवल्याचे दिसत नाही, असे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘भारतीय प्रशिक्षकाच्या निवडीसाठी आम्हीच पूर्वीच्या अस्थायी समितीची क्रिकेट सल्लागार समिती म्हणून नियुक्ती केली. पण आम्हाला कोणत्याही प्रकारे हितसंबंध दिसत नाहीत.’’
कपिलदेव यांनाही नोटीस
बीसीसीआयचे नीती अधिकारी डी. के. जैन यांनी क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष कपिलदेव यांनाही परस्परहितसंबंधाच्या तक्रारीवरून नोटीस पाठवली असून १० ऑक्टोबपर्यंत आपले उत्तर देण्यास सांगितले आहे. ‘‘प्रतिज्ञापत्राद्वारे या तक्रारीला प्रत्युत्तर देण्याच्या सूचना ‘सीएसी’ला देण्यात आल्या आहेत,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्यपद भूषवणे अभिमानास्पद क्षण होते. ‘सीएसी’ची वर्षांतून एकदा किंवा दोन वर्षांतून एकदा बैठक होते, त्यामुळे परस्पर हितसंबंधाचा मुद्दा कुठे येतो, हेच मला समजत नाही. हितसंबंधाचे आरोप होऊ लागल्यामुळे सद्य:परिस्थितीत माजी क्रिकेटपटूंना योग्य अशी प्रशासकीय भूमिका शोधूनही सापडणार नाही.
– शांता रंगास्वामी