शेवटच्या टप्प्यात संघव्यवस्थापनाने वाऱयावर सोडले!

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-28 05:04:00

img

माजी स्टार फलंदाज युवराज सिंगची खरमरीत टीका

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

‘आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यात संघव्यवस्थापनाने मला शब्दशः वाऱयावर सोडले. 2011 आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील लक्षवेधी योगदानानंतरही मला संघव्यवस्थापन किंवा अन्य संबंधित घटकांपैकी कोणाचीही साथ लाभली नाही. जर त्यांची साथ लाभली असती तर 2011 विश्वचषक स्पर्धेनंतर मी आणखी एक विश्वचषक खेळू शकलो असतो’, अशा शब्दात माजी स्टार फलंदाज युवराज सिंगने आपली खंत व्यक्त केली. ‘आपण जे क्रिकेट खेळले, ते कोणत्याही गॉडफादरशिवाय होते’, असेही तो म्हणाला.

यंदा या वर्षाच्या प्रारंभी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱया युवराजने त्यापूर्वी यो-यो चाचणी पार केली होती. पण, त्यानंतरही संघात निवड न झाल्याने त्याची बरीच निराशा झाली होती. या पार्श्वभूमीवर तो बोलत होता.

यो-यो चाचणी पार केल्यानंतरही वगळले

‘2017 चॅम्पियन्स चषक स्पर्धेनंतर 8-9 सामन्यात मी खेळलो आणि त्यात 2 सामन्यात सामनावीर पुरस्कार संपादन केला. मला दुखापत झाली आणि लंकेविरुद्ध मालिकेसाठी तयारी करण्याची सूचना मला केली गेली. पण, याचवेळी मला यो-यो चाचणी पार करण्यास भाग पाडले गेले. मी ती चाचणी 36 व्या वर्षी पार पाडली. तरीही मला प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्याची सूचना केली गेली. वयामुळे मी यो-यो चाचणी पार करु शकणार नाही आणि अशा परिस्थितीत मला वगळणे सोपे होईल, असा त्यांचा होरा होता. पण, 15-16 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱया खेळाडूला अशी वागणूक देणे दुर्दैवी स्वरुपाचे होते’, अशी खंत युवराजने व्यक्त केली.

‘सेहवाग, झहीरवरही व्यवस्थापनाचा अन्यायच’

‘अनुभवी खेळाडूशी थेट संवाद साधणे आणि रितसर चर्चा करणे हा पर्याय समोर होता. पण, तसे काहीही झाले नाही. हीच वागणूक थोडय़ाफार फरकाने विरेंद्र सेहवाग, झहीर खान यांनाही देण्यात आली. पण, खेळातून निवृत्ती घेतली, याचे मला दुःख नाही. माझ्या निवृत्तीची वेळ योग्यच होती. मला भारताबाहेर थोडे क्रिकेट खेळायचे होते. काही गोष्टी मनासारख्या होत नसताना तोच पर्याय होता. केव्हा निवृत्त व्हावे, याबद्दल माझ्या मनात बरेच विचार होते. काही वर्षांपूर्वी मी विवाहबद्ध झालो. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा टप्पा मात्र माझ्यासाठीही बोजाच ठरला होता’, असे युवराज तपशीलवार बोलताना म्हणाला.

‘देशाबाहेरील लीगमध्ये खेळायचे असेल तर मला निवृत्त व्हावे लागणार होते आणि यामुळे निवृत्तीसाठी तीच योग्य वेळ होती. निवृत्ती स्वीकारुन युवा खेळाडूंना संघाला पुढे नेण्यासाठी संधी उपलब्ध करण्याचा निर्णय मी त्यावेळी घेतला’, असे युवीने पुढे नमूद केले. 

विराटवरील भार कमी करा, टी-20 चे नेतृत्व रोहितकडे सोपवा

तिन्ही क्रिकेट प्रकारात नेतृत्वामुळे विराट कोहलीवर अधिक ‘भार’ पडत असेल तर अशा परिस्थितीत टी-20 क्रिकेटमधील नेतृत्वासाठी रोहित शर्माचा विचार करावा, अशी सूचना युवराज सिंगने याप्रसंगी केली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उपकर्णधारपद भूषवत असलेला रोहित आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने मुंबई इंडियन्सला चारवेळा जेतेपद संपादन करुन दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर युवराजने हा पर्याय सूचवला.

‘यापूर्वी वनडे व कसोटी असे दोनच क्रिकेट प्रकार असायचे. त्यामुळे, दोन्ही क्रिकेट प्रकारासाठी एकच कर्णधार असणे ठीक होते. मात्र, आता तीन क्रिकेट प्रकार आहेत आणि विराटवर अतिरिक्त दडपण येत असेल तर अशा परिस्थितीत नेतृत्व विभागणे योग्य ठरेल. विराट कोहली जागतिक स्तरावरील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्यामुळे, त्याच्यावर अधिक भार असणार नाही, याची दक्षता भारतीय संघव्यवस्थापनाला घ्यावी लागेल’, असे तो म्हणाला. 

…म्हणूनच भारत विश्वचषक जिंकू शकला नाही!

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताला महत्त्वाच्या चौथ्या स्थानी योग्य फलंदाज उतरवता आला नाही, त्यावरही युवराजने येथे टीका केली.

तो म्हणाला, ‘फलंदाजी क्रम कोणताही असो, तेथे फलंदाजी करण्यासाठी आपल्याकडे सक्षम पर्याय कोणता आहे, हे शोधावे लागते आणि त्या खेळाडूच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे लागते. पण, यंदाच्या विश्वचषकात तसे दिसून आले नाही. या क्रमांकावरील सर्वाधिक धावा 48 इतक्या होत्या. कर्णधार, प्रशिक्षक, निवड समितीला चौथा क्रमांक महत्त्वाचा असतो, इतके तरी समजून घेण्याची गरज होती. विशेषतः इंग्लंडमध्ये सीम गोलंदाजीला पोषक वातावरण असताना हे आणखी महत्त्वाचे होते. चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरणारा खेळाडू तांत्रिकदृष्टय़ा भक्कम असावा लागतो. पण, विजय शंकरकडे तो अनुभव नव्हता आणि ऋषभ पंतकडेही तो अनुभव नव्हता. दिनेश कार्तिक यात अनुभवी होता. पण, त्याला अन्य सामन्यात बाहेर बसवले गेले आणि ऐन मोक्याच्या क्षणी उपांत्य फेरीत उतरवले गेले. एखादा खेळाडू स्वतःच्या क्रमवारीविषयीच असुरक्षित असेल तर तो आपली नैसर्गिक खेळी साकारु शकत नाही. भारत वर्ल्डकप जिंकू शकला नाही, याचे मुख्य कारण हेच आहे’.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN