संजु सॅमसनचे दुसरे जलद द्विशतक

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-13 04:27:00

img

वृत्तसंस्था/ अलूर

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथील केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात केरळचे प्रतिनिधीत्व करताना यष्टीरक्षक आणि फलंदाज संजु सॅमसनने वनडे क्रिकेटमध्ये दुसरे जलद द्विशतक झळकविले. गोवा आणि केरळ यांच्यातील या सामन्यात सॅमसनने 129 चेंडूत 10 षटकार आणि 20 चौकारांसह 212 धावा फटकाविल्या.

अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये वनडेत द्विशतक झळकविणारा केरळचा संजु सॅमसन हा भारताचा सहावा फलंदाज आहे. द्विशतक नोंदविणाऱया यादीत सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, शिखर धवन आणि कर्ण कौशल यांचा यापूर्वीच समावेश झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत जलद द्विशतक झळकविणारा संजु सॅमसन हा तिसरा भारतीय फलंदाज आहे.

24 वर्षीय सॅमसनने 125 चेंडूत द्विशतक झळकविले. सर्वात जलद द्विशतक झळकविणारा तो पहिला भारतीय फलंदाज असून जागतिक फलंदाजांमध्ये तो दुसरा आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 120 चेंडूत सर्वात जलद द्विशतक झळकविण्याचा विक्रम केला असून तो अद्याप अबाधित आहे.

केरळ आणि गोवा यांच्यातील या सामन्यात सॅमसनच्या द्विशतकाच्या जोरावर केरळने 50 षटकांत 3 बाद 377 धावा जमविल्या. संजु सॅमसनने सचिन बेबीसमवेत तिसऱया गडय़ासाठी 338 धावांच्या भागिदारीचा नवा विक्रम केला असून या जोडीने अ दर्जाच्या क्रिकेटमधील यापूर्वी टॉम मुडी आणि टॉम कर्टीस या ऑस्ट्रेलियन जोडीने तिसऱया गडय़ासाठी केलेला 309 धावांच्या भागिदारीचा 25 वर्षांचा विक्रम मागे टाकला आहे. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सॅमसनने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासामध्ये सर्वोच्च धावांचा विक्रम नोंदविला असून त्याने कौशलचा यापूर्वीचा विक्रम मागे टाकला आहे.

50 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत तिसऱया क्रमांकावर फलंदाजी करताना द्विशतक झळकविणारा सॅमसन हा पहिला भारतीय फलंदाज आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत संजु सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. दक्षिण आफ्रिका अ संघाविरूद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेतील दुसऱया सामन्यात भारत अ संघाकडून खेळताना सॅमसनने 91 धावांची खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN