सचिन तेंडुलकरने वन-डे क्रिकेटमध्ये सुचवला मोठा बदल

Loksatta

Loksatta

Author 2019-11-05 19:35:05

img

भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन-डे क्रिकेटमध्ये मोठा बदल सुचवला आहे. फलंदाज आणि गोलंदाज यांना समसमान संधी मिळावी यासाठी वन-डे क्रिकेटमध्ये बदल करणं गरजेचं असल्याचं मत सचिनने व्यक्त केलं. दोन्ही बाजूंनी एका विश्रांतीसह २५-२५ षटकांचा खेळ झाला तर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही रस निर्माण होईल आणि सामन्याचं प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीसाठीही हे फायदेशीर ठरेल, असं सचिन म्हणाला.

“उदाहरणार्थ अ आणि ब संघामध्ये ५० षटकांचा सामना होत आहे. अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिली २५ षटकं फलंदाजी केल्यानंतर पुढची २५ षटकं ब संघ फलंदाजी करेल. २६व्या षटकापासून अ संघ पुन्हा एकदा फलंदाजीला सुरुवात करेल. जितक्या विकेट शिल्लक असतील तिथून ते डाव पुढे सुरू करतील. जर त्यांच्या सगळ्या विकेट पहिल्या 25 षटकांत गेल्या असतील तर ब संघाला सलग 50 षटकं खेळायला मिळतील. ब संघाला आपल्याला मिळालेलं लक्ष्य गाठण्यासाठी अखेरची २५ षटकं मिळतील. समजा अ संघाने पहिल्या २५ षटकांमध्ये पाच विकेट गमावल्या तर ब संघाच्या डावानंतर सहाव्या विकेटपासून पुढे अ संघाला आणखी 25 षटकं मिळतील,” टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सचिन बोलत होता.

या प्रकारामुळे दोन्ही संघांना सामना जिंकण्याची समसमान संधी मिळेल असं सचिनने स्पष्ट केलं. “या प्रकारात प्रत्येक संघाला पुनरागमन करण्याची संधी आहे. वन-डे सामन्यात एका संघाने नाणेफेक जिंकली आणि मैदानात दव असेल तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्यांना फारशी संधी नसते. ओला चेंडू अनेकदा बॅटची कड घेऊन वेगाने जातो.” सचिन आपल्या कल्पनेबद्दल बोलत होता. याआधीही सचिनने आयसीसीकडे वन-डे क्रिकेटमध्ये बदल करण्याचे प्रस्ताव दिले होते. यावर आयसीसीने चर्चाही केली होती, मात्र एकदाही संकल्पना अमलात आणली गेली नव्हती. त्यामुळे सचिनच्या या प्रस्तावावर आयसीसी काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD