सर्फराज अहमदला नेतृत्वपदावरुन डच्चू
पीसीबीचा तडकाफडकी निर्णय, अझहर अली, बाबर आझमकडे अनुक्रमे कसोटी, टी-20 संघाचे नेतृत्व
कराची / वृत्तसंस्था
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शुक्रवारी सर्फराज अहमदची नेतृत्वपदावरुन हकालपट्टी करत आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी कसोटी संघाचे नेतृत्व अनुभवी फलंदाज अझहर अलीकडे तर टी-20 संघाचे नेतृत्व बाबर आझमकडे सोपवले. पाकिस्तानी क्रिकेट संघाला अलीकडेच घरच्या मैदानावर श्रीलंकेकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची पीसीबीने गंभीर दखल घेतली असल्याचे या निवडीत स्पष्ट झाले.
पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियन भूमीत 2 कसोटी तर 3 टी-20 सामने खेळले आहे. सर्फराज मागील दोन वर्षांपासून तिन्ही क्रिकेट प्रकाराचे नेतृत्व भूषवत होता. त्यानेच 2017 मध्ये पाकिस्तानला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकून दिली. पण, त्याच्या नेतृत्वाखाली कसोटी व वनडे क्रिकेट प्रकारात पाकिस्तानचा संघ मानांकनात बराच घसरत राहिला. शिवाय, अलीकडेच झालेल्या टी-20 मालिकेत लंकेने त्यांना धोबीपछाड दिली होती.
वास्तविक, आयसीसी चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताला नमवत जेतेपद संपादन केले, त्यावेळी सर्फराज अवघ्या पाकिस्तानी क्रिकेटच्या गळय़ातील ताईत बनला. पण, त्यानंतर संघाचे प्रदर्शन निराशाजनक ठरले. मिकी आर्थर प्रशिक्षक असताना संघाला या अपयशाच्या गर्तेतून अजिबात सावरता आले नाही.
झटपट उचलबांगडीमुळे आश्चर्य
मिसबाह-उल-हक सध्या मुख्य प्रशिक्षक व निवड समिती प्रमुखपदाची जबाबदारी हाताळत असून तिन्ही क्रिकेट प्रकारात तो बदल करेल, असे स्पष्ट संकेत होते. पण, सर्फराजला इतक्या झटपट नेतृत्वपदावरुन डच्चू दिला जाईल, अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी पाकिस्तानचा संघ दि. 21 रोजी घोषित केला जाणार आहे.
अझहर अली व बाबर आझम यांच्यावर आता पाकिस्तानी क्रिकेट संघाची मुख्य जबाबदारी असेल, हे या निवडीमुळे स्पष्ट झाले. 25 वर्षीय बाबर आझमकडे प्रथमच नेतृत्वाची धुरा सोपवली गेली असून त्याच्या खात्यावर मर्यादित षटकांच्या 95 लढतीत 12 शतके नोंद आहेत. अझहर अलीने एप्रिल 2015 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत पाकिस्तानी वनडे संघाचे नेतृत्व सांभाळले असून त्यात 12 विजय व 18 पराभव, असे त्याचे प्रदर्शन राहिले आहे. ऑस्ट्रेलियात 1-4 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर तो वनडे कर्णधारपदावरुन पायउतार झाला आणि फेब्रुवारी 2017 मध्ये सर्फराजने त्याची जागा घेतली होती.
34 वर्षीय अझहरने 73 कसोटी व 53 वनडे सामने खेळले असले तरी वनडे संघाच्या नेतृत्वाची धुरा त्याच्याकडे सोपवली जाणे आश्चर्याचे ठरले आहे. 2015 विश्वचषकानंतर तब्बल दोनवर्षे तो वनडे क्रिकेटच खेळलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.