सलामीसाठी विनवण्या कराव्या लागल्या- सचिन

Indian News

Indian News

Author 2019-09-27 09:00:01

img

नवी दिल्ली: भारतीय संघात सलामीत खेळण्यासाठी नेहमीच चुरस असते. मलादेखील 1994 मध्ये न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या वनडे सामन्यात सलामीसाठी खूप विनवण्या कराव्या लागल्या. मात्र या सामन्यात सलामीस चमक दाखविली आणि तेथूनच माझ्या करिअरला कलाटणी मिळाली असे विक्रमवीर सचिन तेंडुलकरने सांगितले.

ऑकलंड येथे झालेल्या या सामन्यात सलामीस खेळता यावे याकरिता संघव्यवस्थापनास सातत्याने विनवणी केली नव्हे भुणभुणच केली. माझा हा हट्ट अखेर व्यवस्थापनाने मान्य केला. या सामन्यात मी 49 चेंडूंमध्ये 82 धावा केल्या. तेथूनच भरवशाचा सलामीवीर म्हणून माझ्या नावावर शिक्‍कामोर्तब झाले. हा सामना सुरू होण्यापूर्वी मी खेळपट्टीचे बारकाईने निरीक्षण केले होते व न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या शैलीचा अभ्यास केला होता.

सलामीस खेळलो तर भरपूर धावा करण्याची मला खात्री होती. सहसा मी कोणत्या स्थानावर खेळण्याबाबत आग्रही नव्हतो. मात्र, त्यावेळी आघाडीच्या जोडीत आपल्यालाच संधी मिळाली पाहिजे असे मला सतत वाटत होते. सरावाच्या वेळीही मी त्याबाबत चर्चा करीत होतो. अखेर माझी इच्छा फळास आल्यामुळे मला खूप आनंद झाला. अर्धी लढाई मी तेथेच जिंकली व जास्त आत्मविश्‍वासाने खेळलो असे सचिनने सांगितले.

सचिनने पुढे सांगितले की, आघाडीत चमक दाखविल्यानंतर मला पुन्हा कधीही सलामीत खेळण्यासाठी विनवणी करावी लागली नाही. फलंदाजीत कोणत्याही स्थानाबर खेळण्याची क्षमता प्रत्येक फलंदाजाकडे असली पाहिजे. काही वेळा आक्रमक खेळ करणाऱ्या फलंदाजास वेळ काढण्याची जबाबदारी स्वीकारावी लागते तर काही वेळा संयमी खेळ करणाऱ्यास आक्रमक पवित्रा घेत खेळावे लागते. कोणत्याही खेळात यश व अपयश या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. पराभवामुळे खचून न जाता त्यापासून बोध घेत यश कसे मिळविता येईल याचा विचार केला पाहिजे.

सचिनने वनडेमधील सलामीचा फलंदाज म्हणून खेळताना पहिल्या पाच डावांमध्ये 82, 63, 40, 63, 73 अशा धावा केल्या. वनडेमधील त्याचे पहिले शतक सप्टेंबर 1994 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकले. त्याने वनडेच्या करिअरमध्ये 463 सामन्यांमध्ये 18 हजार 426 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 49 शतके टोलविली.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD