हरली… लढली… जिंकली…

Dainik Prabhat

Dainik Prabhat

Author 2019-10-20 16:41:00

img

ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा क्षेत्रात एक तत्त्व आहे, “बेस्ट मेन फॉर द जॉब’, तसेच त्यांच्या क्रिकेटमध्येही एक नियम आहे, “कामगिरी सिद्ध करा, नाहीतर चालते व्हा’. त्यातही महिला क्रीडापटूंच्या बाबतीत हे आणि असे नियम जरा जास्तच कसोशीने पाळले जातात. पण तरीही त्यांच्या क्रीडा क्षेत्रात एक लढाऊ बाणा आहे आणि तो सातत्याने सिद्ध देखील होतो. क्‍लेअर पोलसॅक हीदेखील अशीच लढाऊ क्रिकेट पंच. खरेतर क्‍लेअर ही एक शिक्षिका आहे. तरीही क्रिकेटवर तिचे जीवापाड प्रेम असल्याने तिने एक खेळाडू म्हणून नव्हे तर पंच म्हणून काम करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. सुरुवातीला तिला सातत्याने अपयश येत गेले. तिच्या जागी अन्य कोणतीही स्त्री असती तरी तिने केव्हाच नाद सोडून दिला असता. पण तिने नाद सोडला नाही तर सातत्याने प्रयत्न करत राहिली. हरली… लढली… जिंकली अशी कामगिरी तिने केली.

1988 साली जन्मलेल्या क्‍लेअरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक पंच म्हणून कारकीर्द घडविली. खरोखरच दृष्ट लागण्यासारखे यश तिने मिळविले. महिला विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीत पंच म्हणून काम करणाऱ्या जगातील चार महिला पंचांपैकी क्‍लेअर एक आहे. तिने 2017 साली आंतरराष्ट्रीय टी-20 स्पर्धेच्या एका सामन्यात पंच म्हणून काम केले. पुरुषांच्या स्थानिक स्पर्धेत पंच म्हणून काम करणारी ती एकमेव महिला पंच आहे. 2017 साली न्यू साऊथ वेल्स विरुद्ध क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघातील सामन्यात तिने पंचगिरी केली. तिने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील क्रिकेट सराव सामन्यातही पंचगिरी केली. 2018 साली झालेल्या विश्‍वकरंडक टी-20 स्पर्धेतील बारा पंचांमध्ये तिचा समावेश होता.

2019 साली नामिबियात झालेल्या जागतिक विश्‍वकरंडक डिव्हीजन दोनमधील पंचगिरी करणाऱ्या आठ पंचांच्या गटातही तिने स्थान मिळविले होते. याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिनेच पंच म्हणून काम पाहिले. असा गौरव यापूर्वी कोणत्याही महिला पंचाचा झाला नाही. मे 2019 मध्ये तिच्या आयुष्यात खूप मोठा क्षण आला तो म्हणजे तिला चक्‍क पुरुषांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून काम पाहण्याची संधी मिळाली. तिच्या एकेकाळच्या अपयशाला पूर्णपणे धुऊन काढण्याची तिच्या इच्छाशक्‍तीचा विजय झाला. स्कॉटलंडमध्ये झालेल्या 2019 च्या महिला विश्‍वकरंडक टी-20 स्पर्धेतही तिला पंच म्हणून काम पाहण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पंचांच्या गुणवत्ता वाढीसाठी जो प्रकल्प हाती घेतला होता आणि देशातील नवोदित पंचांना अनुभवी पंचांचे मार्गदर्शन मिऴावे यासाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्‍त केलेल्या समितीमध्ये ज्या पंचांना नियुक्‍ती केले गेले त्यात क्‍लेअरचा देखील समावेश होता. हीच गोष्ट तिच्यासाठी कारकिर्दीतील सुवर्णक्षण ठरली.

आंतरराष्ट्रीय पंच बनण्याचे स्वप्न ज्यावेळी तिने पाहिले होते, त्यावेळी तिला सुरुवातीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या पंच परीक्षेत उत्तीर्ण होण्यात तिला सातत्याने अपयश आले होते. तिच्यावर शेरेबाजीही होत होती. त्यावेळी ती एका नैराश्‍याच्या कोशात देखील गेली होती. तिची एक शिक्षिका म्हणून यशस्वी असलेली वाटचाल देखील संकटात सापडली होती. तिने बऱ्याच कालावधीनंतर सगळ्या परिस्थितीचा विचार केला आणि समुपदेशकाची मदत घेण्यास सुरुवात केली.

नैराश्‍यातून बाहेर येण्याचे तिचे प्रयत्न फलदायी ठरले आणि तिने पुन्हा एकदा यश मिळविण्यासाठी कंबर कसली. यावेळी मात्र तिच्या प्रयत्नांना यश आले आणि ती पंच परीक्षेत उत्तीर्ण झाली. केवळ उत्तीर्णच झाली असे नाही तर तिने अपयशाने खचून न जाता कार्यरत राहिलो तर एक दिवस यश निश्‍चितच मिळते हे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला दाखवून दिले. ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये आता ती तिसऱ्या पंचांची भूमिका निभावत आहे.

पोलसॅक खरेतर अपघातानेच पंचगिरीकडे वळली. लहानपणी तिला क्रिकेटच नव्हे तर कोणत्याही क्रीडाप्रकारात रस नव्हता. तिच्या एका मैत्रिणीने तिला पंचांच्या कोर्सची माहिती दिली. ती ज्या वातावरणात वाढली त्या काळी कोणत्याही मुली क्रिकेटबाबत रस घेत नव्हत्या. इतर खेळ खेळायची मात्र क्रिकेट खेळण्याची आवड नव्हती आणि ते देखील मुलांबरोबर खेळावे लागेल म्हणून तिने या खेळाचा कधी विचारही केला नाही. सोळावे वरीस धोक्‍याचं म्हणतात पण तिच्या बाबतीत तर हे वय यशाचे बनले. पंचांसाठी न्यू साऊथ वेल्स मधील ग्लोबर्न जिल्हा क्रिकेट संघटनेची पंचांच्या कोर्सची जाहिरात तिच्या पाहण्यात आली आणि तिने त्याबाबत विचार करायला सुरुवात केली. त्यात तिने नाव नोंदविले ते केवळ हौस म्हणून, मात्र त्यानंतर तिला या खेळाची गोडी लागली.

आज ती गेली पंधरा वर्षे एक पंच तसेच रेफ्री म्हणून काम करत आहे. नशीब पण कसे असते ना जिला ज्या क्षेत्रात कारकीर्द घडावी असे वाटत असते त्या नेमके विरुद्ध गोष्टी घडतात आणि पुढे त्याच क्षेत्रात आपण काम करू लागतो. तिने परीक्षा दिली, त्याचा निकाल चांगला लागला नाही पण तिने हिंमत हरली नाही आणि सातत्याने प्रयत्न करून अखेर यश खेचून आणले. महिलांच्याच नव्हे तर पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांमध्येही तिने पंच म्हणून काम केले. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात तिने जे यश मिळविले त्यापासून प्रेरणा घेत त्यानंतर अनेक मुली या क्षेत्रात येऊ लागल्या आणि त्यांना देखील उच्च दर्जाचे क्रिकेट पाहायला व त्यात पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आजही क्रिकेट खेळणाऱ्या काही देशांमध्ये पंच केवळ पुरुषच असावेत असा हट्ट असतो, मात्र, त्याबाबतीत ऑस्ट्रेलियातील क्रिकेट खूप आधुनिक विचारांवर चालते हे तिचे नशीब. आज तिने नवोदित पंचांसमोर आपण महिला असलो तरीही या क्षेत्रात कारकीर्द घडवू शकतो असा आत्मविश्‍वास तिने दिला.

भारताची लक्ष्मी बनली रेफ्री
क्‍लेअरप्रमाणेच खडतर परिस्थितीचा सामना करत भारताची जी. एस. लक्ष्मी हीदेखील आज आयसीसीची रेफ्री म्हणून काम करत आहे. ती जागतिक क्रिकेटमधील पहिलीच महिला रेफ्री (सामना निरीक्षक) आहे. लक्ष्मीची नियुक्‍ती झाल्यामुळे आता देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर ज्या महिलांना पंच, रेफ्री किंवा क्रिकेटशी त्याचबरोबर कोणत्याही खेळाशी जोडले जाण्याचे स्वप्न आहे, त्यांना पोलसॅक आणि लक्ष्मी यांच्याकडून निश्‍चितच प्रेरणा मिळेल. लक्ष्मीने एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सुरुवात केली. ती उपयुक्त फलंदाज तर होतीच शिवाय मध्यमगती गोलंदाजदेखील होती. क्रिकेट खेळत असतानाच तिने निवृत्त झाल्यावर पंच किंवा रेफ्री म्हणून काम करत याच खेळाशी जोडले जाण्यासाठी तयारी केली. ती पंच परीक्षा पास झाल्यानंतर अनेक सामन्यांमध्ये सरस कामगिरी सिद्ध करून आज आंतरराष्ट्रीय रेफ्री बनण्याची किमया साधली. आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेल्या लक्ष्मीने एक खेळाडू म्हणून नाव कमावले आहेच पण आता ती एक यशस्वी रेफ्री म्हणूनही नावाजली जाते.

1999 साली तिची भारतीय संघात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडही झाली होती मात्र तिला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. 2004 साली तिने निवृत्ती घेतली आणि पंच तसेच रेफ्री बनण्यासाठी वाटचाल सुरू केली. त्याचबरोबर ती दक्षिणमध्य रेल्वे संघाची प्रशिक्षक म्हणूनही काम करत होती. अर्थात जेव्हा ती रेफ्री बनली तेव्हापासून तिने प्रशिक्षकाचे काम करणे बंद केले. 2018 साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीसीकडे आंतरराष्ट्रीय रेफ्रीच्या समितीसाठी तिच्याच नावाची शिफारस केली आणि लक्ष्मीची पुढे एक रेफ्री म्हणून नियुक्ती होत राहिली. आजही ती कार्यरत आहे.

ऑस्ट्रेलियाची पोलसॅक काय किंवा भारताची लक्ष्मी काय या दोघींनीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत आज या दोघी या क्षेत्रात पाय घट्ट रोवून आहेत. त्यांची हीच अविश्‍वसनीय वाटचाल जागतिक क्रिकेटमध्ये कौतुकाचा विषय बनली आहे. आता त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत येत्या काळात जागतिक क्रिकेटच्या नकाशावर अशा अनेक महिला पंच आणि रेफ्री पाहायला मिळतील. या दोघींप्रमाणे निर्धार केला तर प्रत्येक महिला पुरुषांच्या बरोबरीने कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर ठरू शकतात.

अमित डोंगरे

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN