IND vs BAN : 'हिटमॅन'ने केला धमाकेदार पराक्रम; धोनीला टाकले मागे
भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला टी २० सामना दिल्लीत सुरू आहे. दिल्लीतील प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली असूनही भारत-बांगलादेश सामना हलवण्याच्या हाकेकडे दुर्लक्ष करीत उभय संघ हा सामना खेळत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाकडून विविध खेळाडूंची चाचपणी सुरू आहे. या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ सर्वात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन याच्या अनुपस्थितीत ही मालिका खेळत आहे.
या सामन्यात रोहित शर्माने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा विक्रम मोडला. रोहित शर्मा सामन्यासाठी मैदानात उतरला, तेव्हाच त्याने धोनीला मागे टाकले. रोहित शर्माचा हा ९९ वा टी २० सामना आहे. या आधी भारताकडून पुरुष क्रिकेट संघात धोनीने सर्वाधिक ९८ आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट सामने खेळले होते. तो विक्रम रोहितने मोडला. भारताकडून सर्वाधिक टी २० क्रिकेट सामने हरमनप्रीत कौर (१००) हिने खेळले आहेत. पुढील सामन्यात रोहितला तिच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. पुरुष क्रिकेटमध्येदेखील जगात केवळ शोएब मलिक आणि शाहिद आफ्रिदी या दोघांनीच रोहितपेक्षा जास्त टी २० सामने खेळले आहेत.
Bangladesh wins the toss and elects to bowl first in the 1st @Paytm T20I at Delhi.
Live – https://t.co/bcXGQ5eVdk#INDvBANpic.twitter.com/oZ7IKp8M6P
— BCCI (@BCCI) November 3, 2019
दरम्यान, भारताच्या या सामन्यावर प्रदुषणाची टांगती तलवार आहे. पण असे असले तरीही सामना दिल्लीतच होणार असे स्पष्ट करण्यात आले आहे. अखेरच्या क्षणी सामना अन्यत्र हलवणे अशक्य असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले. बांगलादेश संघाने याबाबत कोणतीही तक्रार केलेली नसली तरी आरोग्याची चिंता अस्तित्वात आहेच. भारत दौऱ्यावर येण्याआधी अष्टपैलू शाकिब अल हसनवर घातलेल्या बंदीमुळे त्यांना धक्का बसला आहे.