IND vs SA : तिसऱ्या कसोटीआधीच आफ्रिकेला मोठा धक्का

Loksatta

Loksatta

Author 2019-10-14 13:00:36

img

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुण्याच्या गहुंजे मैदानावर ऐतिहासिक कामगिरीची नोंदवली. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि १३७ धावांनी मात करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. घरच्या मैदानावरचा भारतीय संघाचा हा विक्रमी सलग ११ वा कसोटी मालिका विजय ठरला.

आफ्रिकेला २-० ने या मालिकेत पिछाडीवर जावे लागले. त्यात आफ्रिकेला आणखी धक्का बसला आहे. आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज खांद्याच्या दुखापतीमुळे १९ ऑक्टोबरपासून रांचीला सुरु होणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीला मुकणार आहे. दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतरही त्याने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात ७२, तर दुसऱ्या डावात २२ धावांची खेळी केली. पण त्याच्या दुखापतीच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर मात्र त्याला तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी २ ते ३ आठवड्याचा कालावधी लागणार आहे. त्याच्याऐवजी दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षीय जॉर्ज लिन्ड याची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे.

दरम्यान, दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस आफ्रिकेचा पहिला डाव भारतीय गोलंदाजांनी २७५ धावांवर संपवला. त्यानंतर विराट कोहलीने आफ्रिकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आफ्रिकेची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. दोनही सलामीवीर झटपट बाद झाले. यानंतर डीन एल्गर आणि कर्णधार पाफ डु-प्लेसिस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर डु-प्लेसिस बाद झाला. यानंतर डीन एल्गरही बाद झाल्यामुळे आफ्रिकेचा संघ अधिक अडचणीत सापडला.

उपहाराच्या सत्रानंतर बावुमा आणि मुथुस्वामी यांनी सहाव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना झुंज देण्याचा प्रयत्न केला. केशव महाराज आणि वर्नन फिलँडर यांनी पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही पुन्हा एकदा संयमी खेळ केला, पण ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. दुसऱ्या डावात भारताकडून उमेश यादव आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी ३-३, रविचंद्रन आश्विनने २ तर इशांत आणि मोहम्मद शमीने १-१ बळी घेतला. या मालिकेतला अखेरचा सामना १९ ते २३ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN