IND vs SA : विराटमुळे आफ्रिकेवर ओढवणार नामुष्कीची वेळ?

Loksatta

Loksatta

Author 2019-10-12 19:56:09

img

पुण्याच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाहुण्या संघाचा पहिला डाव २७५ धावांमध्ये संपुष्टात आला. तळातल्या फलंदाजांनी दिलेल्या कडव्या झुंजीमुळे आफ्रिकेने सन्मानजनक धावसंख्या गाठली. केशव महाराज आणि वर्नन फिलँडर यांनी नवव्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना चांगलच झुंजवलं. परंतु तरीदेखील भारताकडे पहिल्या डावात ३२६ धावांची आघाडी राहिली. त्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे आफ्रिकेवर नामुष्कीची वेळ आणण्याची संधी आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे आफ्रिकेला फॉलो-ऑन देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. जर विराटने आफ्रिकेला फॉलो-ऑन देण्याचा निर्णय घेतला, तर आफ्रिकेवर १० वर्षानंतर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवेल. या आधी लॉर्ड्सच्या मैदानावर २००८ साली आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली होती.

दरम्यान, पहिल्या डावात ६०१ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत भारतीय गोलंदांजांनी आफ्रिकेची अवस्था बिकट केली. उपहाराच्या सत्रापर्यंत दक्षिण आफ्रिकेने ६ गडी गमावत १३६ धावांपर्यंत मजल मारली. तिसऱ्या दिवशीही आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. मोहम्मद शमीने नॉर्ट्जेला माघारी धाडत आफ्रिकेला धक्का दिला. यानंतर डी-ब्रून आणि क्विंटन डी-कॉकही ठराविक अंतराने माघारी परतले. दुसऱ्या बाजूने कर्णधार फाफ डु-प्लेसिसने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत एक बाजू लावून धरली.

उपहाराच्या सत्रानंतर मुथुस्वामी आणि कर्णधार फाफ डु-प्लेसिसला माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. रविंद्र जाडेजाने मुथुस्वामीला तर आश्विनने कर्णधार फाफ डु-प्लेसिसला माघारी धाडलं. डु-प्लेसिसने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली, मात्र तो देखील फारकाळ मैदानात तग धरु शकला नाही. आफ्रिकेचे उरलेले फलंदाज आता झटपट माघारी परतणार असं वाटत असतानाच फिलँडर आणि केशव महाराज यांनी संयमी खेळ करत भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिलं नाही. केशव महाराजने ७२ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला फिलँडरने (नाबाद ४४) चांगली साथ दिली. अखेरीस रविचंद्रन आश्विनने केशव महाराजला बाद करत भारताला तिसऱ्या सत्रात यश मिळवून दिले. भारताकडून रविचंद्रन आश्विनने ४, उमेश यादवने ३, मोहम्मद शमीने २ तर रविंद्र जाडेजाने एक बळी घेतला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN