Ind vs SA 3rd Test : आफ्रिकेचा पाय खोलात, भारत वरचढ
रांची कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पाय खोलात गेला आहे. भारताने आपला पहिला डाव ४९७ धावांवर घोषित केल्यानंतर आफ्रिकेची सलामीची जोडी मैदानात आली. मात्र मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी खेळपट्टीचा फायदा घेत उसळी चेंडू टाकत आफ्रिकेच्या फलंदाजांना हैराण केलं. अखेरीस डीन एल्गर आणि क्विंटन डी-कॉक भारताच्या जाळ्यात अडकले. यानंतर पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला, यावेळी दक्षिण आफ्रिकेची अवस्था २ गडी बाद ९ अशी झाली होती. आफ्रिकेचा संघ सामन्यात अद्यापही ४८८ धावांनी पिछाडीवर आहे.
त्याआधी, सलामीवीर रोहित शर्माचं द्विशतक, त्याला अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करत दिलेली उत्तम साथ आणि तळातल्या फलंदाजांनी केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर भारताने रांची कसोटीत आपला पहिला डाव ४९७ डावांवर घोषित केला. खराब सुरुवातीनंतरही भारताने आता सामन्यावर आपली पकड घट्ट केली. भारतीय फलंदाजांनी आफ्रिकन गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. रोहित आणि अजिंक्य माघारी परतल्यानंतर तळातल्या फळीमध्ये रविंद्र जाडेजा, वृद्धीमान साहा, उमेश यादव यांनी फटकेबाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.
त्याआधी द्विशतकवीर रोहित शर्माला २१२ धावांवर आणि अजिंक्य रहाणेला ११५ धावांवर माघारी धाडण्यात आफ्रिकेचे गोलंदाज यशस्वी ठरले. मात्र तोपर्यंत पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. आफ्रिकेकडून लिंडेने ४, कगिसो रबाडाने ३, तर नॉर्ट्जे आणि पिडीटने १-१ बळी घेतला. विराट कोहलीने चहानापानाच्या सत्राआधी काही मिनीटं भारताचा पहिला डाव घोषित केला. त्याआधी, दुसऱ्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात ३५७ धावांपर्यंत मजल मारली होती.
पहिल्या दिवशी भारताची सुरुवात खराब झाल्यानंतर, अजिंक्य-रोहित जोडीने संयमी खेळ करत भारताच्या डावाला आकार दिला. रोहितने पहिल्या दिवशी शतक झळकावल्यानंतर अजिंक्य रहाणेने दुसऱ्या दिवशी आपलं शतक झळकावलं. कसोटी कारकिर्दीतलं अजिंक्यचं हे ११ वं शतक ठरलं. चौथ्या विकेटसाठी रोहित-अजिंक्य जोडीने २६७ धावांची भागीदारी केली. याव्यतिरीक्त तळातल्या फळीत भारताकडून रविंद्र जाडेजा ५१ तर उमेश यादवने षटकारांची आतिषबाजी करत ३१ धावा केल्या.