INDvsSA : विराटचे मानांकन तर घसरलं; आता टीम इंडियाचेही धोक्यात
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुदध होणारी तीन कसोटी सामन्यांची मालिका भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. विराट कोहलीने कसोटीतील पहिले स्थान गमावल्यानंतर आता कर्णधार म्हणून त्याची कसोटी पणास लागणार आहे.
कसोटी क्रिकेटमध्या सध्या भारत 115 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर न्यूझीलंड 109 आणि दक्षिण आफ्रिका 108 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुदधची मालिका 1-0 अशी जिंकली तरी भारत पहिल्या स्थानावर कायम राहिल पण दक्षिण आफ्रिकेने 1-0, 2-0 किंवा 3-0 असा विजय मिळवला तर ते पहिल्या स्थानी जातील आणि भारताची दुसऱ्या क्रमांकावर घसरण होईल.
फलंदाजीच्या क्रमवारीत विराट कोहली पहिला होता, पण ऍशेस मालिकेत स्टीव स्मिथने शतकांचा सपाटा लावून धावांचा रतिब घातला आणि पहिले स्थान मिळवलेले आहे. आता कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही विराटची प्रतिष्ठा पणास लागणार आहे.